भजे
Bhaji — the king of romantic snacks
आपल्या महाराष्ट्रीयन जेवणातल्या प्रत्येक पदार्थाला नुसती वेगळी चवच नसते तर तो पदार्थ मनामध्ये वेगळी रसोत्पत्ति देखील करतो. आता हेच पाहा ना - पोळी, लापशी, साधं वरण नि भात, साबुदाण्याची खिचडी बघितल्या बघितल्या करूण रस उत्पन्न करतात. ठेचा, खर्डा, लोणचं, चटणी रौद्र रसाची उत्पत्ती करते. पुरणपोळी अद्भुत रसाची निष्पत्ती करते, तर पातळ भाजी सगळ्या रसांना निरस करते. पण रसांचा राजा शृंगार रस निर्माण करण्याची ताकद फक्त आणि फक्त म्हणजे ‘भजे’ या एकमेव पदार्थात आहे हे कोणीही मान्य करेल. नुसतं ‘भजे’ या शब्दाचा उच्चार केला की लगेच पावसाळी हवा - ओलंचिंब होणे - गारवा - हिरवागार निसर्ग - रोमँटिक गाणे असे सगळे स्लाईड-शो ऑटो-ट्रान्झिट मोड मध्ये सुरू होतात. जर तुम्हाला कोणी सहज जरी ‘भजे खाणार का?’ म्हटलं की विचारणारा खट्याळपणे विचारतोय असा भास होतो. जेवणाच्या भरलेल्या ताटात इतर सर्व पदार्थांमध्ये भजे असणे म्हणजे विविध प्रकारच्या माणसांच्या घोळक्यात रंगीत कपडे घालून, छान सेंट मारून थोडा हलका चावटपणा करणारं कोणीतरी असावं असं वाटतं. त्यामुळे इतर पदार्थांना मिळाले नसतील एवढ्या ‘खमंग’, ‘कुरकुरीत’, ‘मस्त’, ‘चटपटीत’, ‘गरमागरम’, ‘झणझणीत (मिरची)’, ‘चमचमीत’, ‘खेकडा’ सारख्या विशेषणांची भजे मानकरी ठरले आहेत.
भरतमुनींनी म्हटल्याप्रमाणे ‘विभावानुभाव व्यभिचारी प्रयोगात संयोगात रसनिष्पत्ती!’ -
म्हणजे विभाव, अनुभाव, व्यभिचारी भाव यांच्या संयोगातून रसनिष्पत्ती होते. यातला पावसाळी हवा - विभाव, हिरवा निसर्ग - अनुभाव असला तर भजी हा व्यभिचारी भाव मानायला हरकत नाही.
गरम भजी खाण्याची केवळ प्रक्रियाच आल्हाददायक नसते तर भजी करण्याची रेसिपी पण बघणाऱ्याला अधाशी बनवते. भजी बनतांना माणसालाच नव्हे तर त्या गरम तेलालाही आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. त्यात पुन्हा भज्यांचे पीठ तेलात पडल्यापडल्या होणारा ‘चर्रर्रर्र’ आवाज पोटातल्या कावळ्यांनाही ऐकू जातो आणि ते अजूनच जोरात ओरडायला लागतात. जेवण करणाऱ्याला ‘भोजन’ म्हणत असतील तर भजं खाण्याला ‘भजन’ म्हटलेले चालले असते, पण देवपूजा करणाऱ्यांनी भजन त्यांच्याकडे नेऊन भजांवर अन्याय केला आहे.
पण काही झाले तरी भजी खावी गरमच! थंड भजी खाणे म्हणजे एखाद्या लावणीसम्राज्ञीची लावणी न बघता ती संपल्यानंतर तिच्याशी ऑफिसमध्ये बसून नृत्य कलेविषयीविषयी चर्चा करण्यासारखे आहे.
भजांनी त्यांच्या अंगभूत गुणवैशिष्ट्यांमुळे केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारत आणि इतर बरेच देशही पादाक्रांत केले आहेत. त्यामुळे त्याचे पकोडे, बज्जी, पोनॅको, फक्कुरा, फुलौरी हे आंतरराज्यीय व आंतरराष्ट्रीय बांधवही तिथल्या लोकांना ब्रह्मानंद देत आहेत. म्हणून माणसांनाच नव्हे देवांनाही भजे आवडत असणार! म्हटलंच आहे ना..
| जो ‘भजे’ हरि को देगा, सोही परमपद पावेगा |
— सुनील भातंब्रेकर
© Sunil Bhatambrekar, Pune