रंग हिरवा

Green — creation and youth

‘रंग हिरवा’ as printed in Dainik Sanchar
As printed in Dainik Sanchar (tap to enlarge)

‘हिरवे हिरवेगार गालिचे। हरिततृणाच्या मखमालीवरचे।’

बालकवींच्या ह्या अजरामर कवितेत हिरव्या रंगाच्या पार्श्वभूमीवर रविकर व फुलराणीच्या अनोख्या विवाहसोहळ्याचे अत्यंत हृदयस्पर्शी काव्यमय वर्णन केलंय. कवितेची सुरुवातच हिरवी हिरवीगार झाल्यानं एक सुखद ताजेपणा संपूर्ण कवितेत टिकून राहातो. ही आहे हिरव्या रंगाची किमया!

हिरवा रंग नुसता उच्चारला तरी कसं गार वाटतं! हिरव्या रंगाची हीच तर खासियत आहे. सृष्टीकर्त्यानं जाणीवपूर्वक सर्व वृक्षवल्लींचा रंग हिरवा ठेवला असावा. हा रंग निर्मितीचा आहे, सृजनशीलतेचा आहे, जिवंतपणाचा आहे.

एखाद्या लांब उडी, उंच उडी अथवा धावण्याची शर्यत सुरू होण्याच्या काही क्षण आधी तो तरुण खेळाडू मुठी आवळून आत्मविश्वासाने जागेवरच हलकेहलके उसळत, वार्मअप करत स्वतःचा नंबर येण्याची अधीरतेने वाट पाहात असतो. हिरवा रंग त्या तरुण खेळाडूसारखा भासतो. उत्साह, उल्हास, तारुण्याची सळसळ म्हणजे हिरवा रंग!

रंगशास्त्र असे सांगते की, मानवी डोळ्यांना सगळ्यात सुखावह रंग हा हिरवा आहे. म्हणूनच की काय, ऑपरेशन करणारे डॉक्टर्स हिरव्या रंगाचे ॲप्रन घालतात. ह्या रंगाचे मनात पडणारे प्रतिबिंब हे बहुतांशी नवनिर्मितीचेच असते. करडा, तपकिरी, गडद निळा वगैरे रंगांना माणूस एकवेळ कंटाळेल पण हिरवा रंग त्याच्या संपत आलेल्या आशा-आकांक्षाही पुन्हा प्रज्वलित करतो. हिरव्या रंगात ती क्षमता आहे.

ह्या रंगाचा हरितोत्सव पाहायचा असेल तर घनदाट जंगलात दिवसाउजेडी जावे. हिरव्या रंगाच्या अनंत छटा बघून मन प्रफुल्लित होऊन डोळे निवतात. नुकतेच पालवी फुटलेले झाडाचे छोटे पान पाहा – हलकीशी हिरवेपणाची छटा असलेले ते मऊ सूत नाजूक पान पाहून व स्पर्शून तुमचे मन हरखून जाणार नाही तर काय? एखाद्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत असे जेव्हा म्हणतात तेव्हा ‘पल्लवीत’ची व्युत्पत्ति ‘पालवी’पासूनच झाली असणार. नाहीतर नुसत्या हिरवळीवर उघड्या पायांनी चाला. वरील कविता पंक्तीत म्हटल्याप्रमाणे मखमालीवर चालल्यासारखे वाटते की नाही  बघा!

हिरव्या रंगाचे चित्रकारांना सर्वाधिक आकर्षण उगाच नसते. कारण चित्र हीच एक निर्मिती असते आणि त्यासाठी ह्याहून योग्य रंग कुठला असणार?

हा रंग आपल्याला ताजेतवाने करून जागवतच नाही तर आपले खाद्य बनून जगवतोदेखील. शाकाहारामध्ये हिरव्या पालेभाज्या खाऊनच डोळे व पोट दोन्ही भरते. निसर्गाच्या ह्या रंगाला एवढे महत्त्व आले आहे की, पर्यावरणपूरक प्रत्येक क्रियेला ‘टुवर्डस्‌ ग्रीन’ ह्याच संज्ञेने संबोधतात. जर एखाद्याला भरपूर वर्ष जगायचं असेल, तेही ताजेतवाने राहात, नाविन्याची कास धरून, उत्साहपूर्ण वातावरणात, - तर त्याने फक्त निसर्गातले आणि मनातले हिरवेपण जोपासावे. बाकी सारे आपोआप होते, अगदी नैसर्गिकरित्या! उगाच नाही अखंड सौभाग्याचा रंग आपल्या संस्कृतीत इतर कुठलाही न ठेवता हिरवा ठेवलाय. तेव्हा सारेजण या, हिरवळीवर गात नाचत एका सुरात गा –

‘हिरवे हिरवेगार गालिचे। हरिततृणाच्या मखमालीवरचे॥’

— सुनील भातंब्रेकर

© Sunil Bhatambrekar, Pune

You may also enjoy

More essays

All writings
ललित विनोद 25 Nov 20202 min read

भजे

Bhaji — the king of romantic snacks

आपल्या महाराष्ट्रीयन जेवणातल्या प्रत्येक पदार्थाला नुसती वेगळी चवच नसते तर तो पदार्थ मनामध्ये वेगळी रसोत्पत्ति देखील करतो. आता हेच पाहा ना - पोळी, लापशी, साधं व…

Read essay
ललित विनोद 8 Nov 20202 min read

चव

Taste

देवाकडे भरपूर काहीतरी मागून देखील, भरपूर जाऊद्या पुरेल एवढेही काही मिळेनासे झाल्यावर आम्ही अंतर्मुख झालो. असे का व्हावे, याचा विचार करताकरता तो वाक्प्रचार कानाव…

Read essay
नवरंग 19 Oct 20212 min read

रंग जांभळा

Purple — the colour of the heart

रंगाला जर स्पर्श करता आला असता तर सगळ्यात मुलायम रंग जांभळा लागला असता. जांभळा रंग बनवायला निसर्गाला प्रचंड कष्ट पडले असणार. लाल, काळा, निळा, थोडा गुलाबी, हलकास…

Read essay