रंग लाल

Red — courage, love and life-blood

‘रंग लाल’ as printed in Dainik Sanchar
As printed in Dainik Sanchar (tap to enlarge)

जवळपास प्रत्येकाने रंगासाठी त्या रंगाच्या  पुढे एक रंग विशेषण लावतात, उदा. पिवळाधमक, हिरवाजर्द, निळंशार, काळाकुट्ट वगैरे. त्यात ‘लाल’च्या पुढे ‘भडक’ वापरतात. म्हणजे ह्या लाल रंगाचा जन्मच मुळी एखादी गोष्ट ‘भडक’ करण्यासाठी झालाय असे वाटते. रंग नसणे म्हणजे काळा किंवा पांढरा असणे आणि रंग असणे ह्याची परिसीमा म्हणजे लाल रंग. रंगीतपणामध्ये रँक नं. १ म्हणजे लाल रंग! कुठलीही तडजोड न स्वीकारता केलेला निर्भेळ रंगाच्या व्याख्येत बसणारा रंग म्हणजे लाल रंग! आपले जीवनदायिनी रक्तच जर लाल रंगाचे आहे, त्यापुढे सगळे रंग फिकेच वाटणार!

लाल रंग म्हटले की, माझ्यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी, स्वराज्यासाठी, आपल्या दोन्ही हातात तळपत्या तलवारी घेऊन त्वेषाने लढणारे, शरीरावरच्या असंख्य जखमांमुळे रक्तबंबाळ झालेले, पावनखिंडीत स्वतःच्या प्राणांची आहुती देणारे शूरवीर बाजीप्रभू देशपांडे उभे राहातात. हा खरा मूर्तिमंत लाल रंग! सळसळते रक्त वाहत असलेले तारुण्य, त्याग, उत्साह!

नखशिखांत पांढरे कपडे घाला आणि कपाळावर फक्त एक लाल रंगाचे गंध किंवा टिळा लावा, सगळा नूरच पालटतो की नाही बघा!

ह्याचा भडकपणा बघूनच माणसाने ह्या रंगाला धोक्याची जाणीव करून द्यायला ठेवलं. मग तो रस्त्यावरचा लाल सिग्नल असो किंवा धोक्याची सूचना देणारे कापड असो. लाल रंगाने आतापर्यंत जेवढ्या लोकांचे प्राण वाचवले तेवढ्या दुसऱ्या कुणी नाही. जहाल म्हटलं की लाल, हे केवळ यमक जुळल्यामुळेच आहे असे नाही.

लाल रंग रक्ताचा, रक्त चालवते हृदयाला आणि हृदय म्हटले की, प्रेम आले. त्यामुळे लाल रंगाला प्रेमाचा रंग म्हटलं तर बाकीच्या रंगांच्या गालावर उगीचच लाली येते. प्रेमाचे प्रतीक असलेले गुलाबही लालच असतो. हा रंग जसा प्रेमाचा तसाच सौभाग्याचाही असल्यामुळे हिंदू धर्मात स्त्रियांच्या कपाळापासून देवेच्या मूर्तीच्या टिळ्यापर्यंत सर्वत्र लाल पसरला असतो.

शाळा-कॉलेजच्या दिवसात गुणपत्रिकेवरची एखाद्या विषयाच्या मार्काखाली अनुत्तीर्ण झाल्यामुळे मिळालेली लाल रेघ त्याच्या आयुष्याला चांगली-वाईट कलाटणी द्यायला भाग पाडते. स्वप्नातही ती लाल रेघ विसरू शकत नाही तो! म्हणून बुद्धिमान मूलं लाल रंगाची रेघ कधीच येऊ देत नाहीत. पण दुसरीकडे मात्र ह्या बुद्धीची देवता आपल्या सर्वांच्या लाडक्या   गणपतीबाप्पाला मात्र रक्तवर्णी कमळेच आवडतात.

हा रंग प्रेमाचा असतो म्हणूनच आईही आपल्या मुलाला मातृस्वरूप वात्सल्याने, प्रेमभराने म्हणते, ‘ये मेरा लाल है!’ - ह्याहून मोठी लाल रंगाची महती काय असणार?

— सुनील भातंब्रेकर

© Sunil Bhatambrekar, Pune

You may also enjoy

More essays

All writings
ललित विनोद 20 Jul 20262 min read

धडक पक्ष्यांची

Why birds never collide

‘झुंजूमुंजू झालं. पूर्वेला तांबडं फुटलं. झाडाच्या एका फांद्यावर रात्रभर पायात फांदी घट्ट पकडून निजलेल्या पाखरांनी डोळे उघडले. चिमण्या उठल्या, कावळे उठले, कबुतरं…

Read essay
भाषा-संस्कृती 25 Oct 20203 min read

काना मात्रा वेलांटी उकार

The jewellery of the Devanagari script

जगात जशा शेकडो बोलीभाषा आहेत तशाच शेकडो लिप्या पण आहेत. त्यात आपल्या देवनागरी पासून ते लॅटिन रोमन व्हाया मंडेरिन, कांजी, काताकाना, हिरागाना, अरेबिक अशा असंख्य ल…

Read essay
नवरंग 19 Oct 20212 min read

रंग हिरवा

Green — creation and youth

‘हिरवे हिरवेगार गालिचे। हरिततृणाच्या मखमालीवरचे।’ बालकवींच्या ह्या अजरामर कवितेत हिरव्या रंगाच्या पार्श्वभूमीवर रविकर व फुलराणीच्या अनोख्या विवाहसोहळ्याचे अत्यं…

Read essay