आग्रह

The gentle art of insisting

तरी सर्वांनी कार्यक्रमाला हेच आग्रहाचे निमंत्रण समजून यावे ही विनंती’ असा मजकूर असलेली आग्रह या संकल्पनेला मान देणारी निमंत्रण पत्रिका आजकाल खूपदा बघायला मिळते. एखाद्याच्या नुसत्या विनंतीला मान देणे वेगळे व आग्रहपूर्वक केलेल्या विनंतीला मान देणे वेगळे!

वास्तविक आग्रह करणे म्हणजे आपली बाजू जोरकसपणे मांडणे. महात्मा गांधीजींनी सत्याचा आग्रह म्हणजे सत्याग्रह केला हे सर्वश्रुत आहे, पण हे आग्रह शाही - राजकीय - कॉर्पोरेट असे अवघड आग्रह झाले. आम्ही बोलतो आहोत ते छोट्या लहानसहान आग्रहा बद्दल - म्हणजे ‘घ्या हो जिलबी, मोजू नका!’ किंवा ‘गाणं म्हणलंच पाहिजे तू आता!’ अशा आग्रहांविषयी!

लहानपणापासून आया पण मुलांना त्यांच्या हेच शिकवतात – ‘कोणाकडे गेलं की लगेच ‘हो’ म्हणू नको! आग्रह केला तरच घे! नाहीतर लगेच घेशील!’ ह्या आग्रहाला मोजमाप नसतं. आता त्या छोट्या बाळाला केव्हा घ्यायचं हे कसे कळणार बरे? ‘घे बाळा लाडू’ म्हटल्यावर लगेच घ्यावा वाटला तरी नाही घ्यायचा! ‘अरे, घे रे, लाजू नको!’ असं म्हटलं की लगेच त्याला आग्रह समजून घेऊन तोंडात गडप करायचा हा साधा हिशोब ते बालमन लगेच करतं!

ते काही असो, खरा मनापासून आग्रह करण्यात आणि करून घेण्यात जी एक प्रकारची आपुलकी, जिव्हाळा असतो ते माणुसकीचे दर्शन करून देणारा असतो. ‘ते काही नाही! आज मुक्काम केल्याशिवाय सोडणार नाही तुम्हाला!’ मधील तळमळ  माणसाला सुखावून जाते! ‘तुमचं अजिबात ऐकणार नाही! साधं जेवण आहे, जेवल्याशिवाय सोडणार नाही म्हणजे नाही!’ एवढं कुणी म्हटलं तरी पोट समाधानाने भरतं! आपण कुणालातरी अंतकरणापासून आग्रह करतोय व तो त्या आग्रहाला मान देतोय किंवा आपल्यालाही कुणीतरी आग्रह करतोय व आपणही त्याला सहृदयतेने बळी पडतोय, यापरते दुसरे कुठलेही मानवी भावभावनांचे सुंदर प्रकटीकरण करणारे उदाहरण नाही.

ह्या आग्रहाला वाटेल ते झाले, कितीही जवळचा असेल तरी, अजिबात बळी न पडणारी एक जमात असते. त्यांचे आग्रहाला मान न  तुकवणे तार्किक, तांत्रिक, आरोग्य, वेळ या सगळ्या दृष्ट्या कितीही बरोबर असले तरी आग्रह करणारा प्रामाणिकपणे आग्रह करत असेल तर त्याला ते कुठेतरी जखमी करते. म्हणून आग्रहाला अल्प का होईना प्रतिसाद देऊन त्यांचा मान ठेवणारे लोक माणूस म्हणून खूप मोठे वाटतात. बळी पडूनही (माणुसकी) जिवंत ठेवणारी आग्रह ही एकमेव बाब असावी असे आम्हाला आग्रह पूर्वक नमूद करावे वाटते ते यासाठीच!

— सुनील भातंब्रेकर

© Sunil Bhatambrekar, Pune

You may also enjoy

More essays

All writings
नवरंग 19 Oct 20212 min read

रंग पांढरा

White — the mother of all colours

पांढरा रंग! मुळात हा रंग आहे की ह्यावरच दुमत आहे. पांढरं हे असतंच, त्याला वेगळा रंग म्हणून वापरायचा तर पांढऱ्यावर पांढरा कसा वापरायचा? किंवा पांढरा रंग हेच मुळी…

Read essay
ललित विनोद 18 Nov 20202 min read

भाषण

The art of the endless speech

‘मित्रांनो, असं म्हणतात प्रयत्नांती परमेश्वर असतो - परमेश्वर सृष्टीचा निर्माता आहे - निर्माता दिग्दर्शक नाटकसिनेमाला असतो - दिग्दर्शक चित्रपटाला योग्य दिशा देतो…

Read essay
भाषा-संस्कृती 13 Nov 20202 min read

शुभहस्ते

By the auspicious hands of…

आपली मराठी भाषा समृद्ध-संपन्न असण्याचे प्रमुख कारण म्हणजे ती संस्कृतोद्भव आहे. त्यामुळे एखाद्या दागदागिन्यांनी नटलेल्या लावण्यवती त्रैलोक्यसुंदरीने साधी रेशमी स…

Read essay