फेटे लग्नातले

Wedding turbans

गेल्या काही वर्षात विवाह-समारंभात हे एक तुरावाले फेटे घालायचे काय फॅड आलंय कळत नाही. लग्न लागायच्या तास-दोन तास आधी एका बाजूला हा फेटा घालण्याचा कार्यक्रम चालू असतो. लहान-थोर, पुरुष- स्त्रिया सगळे दुधाच्या रांगेत उभे राहिल्यासारखे रांगेत उभे राहून फेटे बांधून घेत असतात. स्टार्च-बिर्च मारून कडक केलेल्या त्या रंगीत (बहुधा भगवा) कापडाचा जपानी पंख्यासारखा तुरा आणून एकदा फेटा घातला की त्याचा/तिचा चेहरा हमखास खुलतो. मग कोणीतरी त्याला ‘अरे वा! गावचे पाटील दिसताय! महाराजांचा रुबाब आहे!’ स्त्री असेल तर ‘अरे वा! गावच्या पाटलीणबाई दिसताय! झाशीच्या राणींचा रुबाब आहे!’ – असल्या कॉम्प्लिमेंट्स दिल्या की अजून खुश! या ‘फेटे-सेशन’ नंतर सुरू होते ‘फोटो-सेशन’! मग काय..! मग एकट्याचा काढ, साईड ने काढ, शेमला असा गळ्यात आलेला काढ, तुरा नीट दिसू दे, आमच्या दोघांचा काढ, ग्रुपचा काढ.. हे सगळे काढाकाढ चालू असतानाच मंगलाष्टक चालू होतात आणि तेव्हा कुठे फेट्यांची हौस फिटते.

हा फेटा पण बेटा कशावरही आणि कोणालाही शोभतो, म्हणजे खाली थ्रीपीस सूट घाला, झब्बा पायजमा घाला, साधे शर्ट पॅन्ट घाला, पाचवारी घाला किंवा नऊवारी घाला, डोक्यावर फेटा खुलूनच दिसतो.

तासा-दोन तासातच तो फेटा सैलावतो.  तुराही बसल्याबसल्या झोप येऊन मान झुकावी तसा मान टाकतो आणि मग ते सुटे फेटे मांडवभर इतस्ततः पसरतात.

पूर्वीच्या काळी डोक्यावर फेटा, पगडी, मुंडासं, पदर असं काहीतरी घेतल्याशिवाय लोक घराबाहेर पडत नसत. उघड्या डोक्याने बाहेर जाणे शिष्टाचारात बसत नव्हते. तेव्हा काहीजण हौस म्हणून फेटा काढायचे, आता हौस म्हणून घालतात! पण फक्त लग्नात! कधीकधी गणपतीमध्ये, मिरवणुकीतसुद्धा घालतात, नाही असं नाही! लग्नात मात्र हमखास! नशीब एखाद्या ‘लग्नात भेटा’ ऐवजी ‘लग्नात फेटा’ म्हणत नाहीत, एवढे ते अंगवळणी पडलंय.

फेटे घालण्याची पण एक कला आहे. तरबेज माणसं अशी फटक्यासारखी-नव्हे-फेटक्यासारखी फेटा घालतात. हे दृश्य प्रेक्षणीय असते. आमचे आजोबा स्वतःच स्वतःला आरशात न बघता अगदी सुंदर फेटा बांधायचे. आम्ही थक्क होऊन बघायचो. माणूस ती कला आता विसरला. एक मात्र चांगले झाले, या निमित्ताने फेट्यांना एक प्रकारची नवसंजीवनी मिळाली. त्यामुळे आजकालच्या लग्नसमारंभातले दोन प्रमुख विधी म्हणजे ‘फेरे’ आणि ‘फेटे’!

— सुनील भातंब्रेकर

© Sunil Bhatambrekar, Pune

You may also enjoy

More essays

All writings
ललित विनोद 14 Nov 20202 min read

अर्जंट

Everything is urgent

सरांनी तुम्हाला बोलावलंय.. अर्जंट!!’ – शिपाई. ‘त्यांना सांग, मी दुसऱ्या अर्जंट कामांमध्ये अडकलोय’ ‘मी आधीच सांगितलं होतं, ते म्हणाले, त्यांना अर्जंट कुठेतरी जाय…

Read essay
नवरंग 19 Oct 20212 min read

रंग पांढरा

White — the mother of all colours

पांढरा रंग! मुळात हा रंग आहे की ह्यावरच दुमत आहे. पांढरं हे असतंच, त्याला वेगळा रंग म्हणून वापरायचा तर पांढऱ्यावर पांढरा कसा वापरायचा? किंवा पांढरा रंग हेच मुळी…

Read essay
भाषा-संस्कृती 13 Nov 20202 min read

शुभहस्ते

By the auspicious hands of…

आपली मराठी भाषा समृद्ध-संपन्न असण्याचे प्रमुख कारण म्हणजे ती संस्कृतोद्भव आहे. त्यामुळे एखाद्या दागदागिन्यांनी नटलेल्या लावण्यवती त्रैलोक्यसुंदरीने साधी रेशमी स…

Read essay