फेटे लग्नातले
Wedding turbans
गेल्या काही वर्षात विवाह-समारंभात हे एक तुरावाले फेटे घालायचे काय फॅड आलंय कळत नाही. लग्न लागायच्या तास-दोन तास आधी एका बाजूला हा फेटा घालण्याचा कार्यक्रम चालू असतो. लहान-थोर, पुरुष- स्त्रिया सगळे दुधाच्या रांगेत उभे राहिल्यासारखे रांगेत उभे राहून फेटे बांधून घेत असतात. स्टार्च-बिर्च मारून कडक केलेल्या त्या रंगीत (बहुधा भगवा) कापडाचा जपानी पंख्यासारखा तुरा आणून एकदा फेटा घातला की त्याचा/तिचा चेहरा हमखास खुलतो. मग कोणीतरी त्याला ‘अरे वा! गावचे पाटील दिसताय! महाराजांचा रुबाब आहे!’ स्त्री असेल तर ‘अरे वा! गावच्या पाटलीणबाई दिसताय! झाशीच्या राणींचा रुबाब आहे!’ – असल्या कॉम्प्लिमेंट्स दिल्या की अजून खुश! या ‘फेटे-सेशन’ नंतर सुरू होते ‘फोटो-सेशन’! मग काय..! मग एकट्याचा काढ, साईड ने काढ, शेमला असा गळ्यात आलेला काढ, तुरा नीट दिसू दे, आमच्या दोघांचा काढ, ग्रुपचा काढ.. हे सगळे काढाकाढ चालू असतानाच मंगलाष्टक चालू होतात आणि तेव्हा कुठे फेट्यांची हौस फिटते.
हा फेटा पण बेटा कशावरही आणि कोणालाही शोभतो, म्हणजे खाली थ्रीपीस सूट घाला, झब्बा पायजमा घाला, साधे शर्ट पॅन्ट घाला, पाचवारी घाला किंवा नऊवारी घाला, डोक्यावर फेटा खुलूनच दिसतो.
तासा-दोन तासातच तो फेटा सैलावतो. तुराही बसल्याबसल्या झोप येऊन मान झुकावी तसा मान टाकतो आणि मग ते सुटे फेटे मांडवभर इतस्ततः पसरतात.
पूर्वीच्या काळी डोक्यावर फेटा, पगडी, मुंडासं, पदर असं काहीतरी घेतल्याशिवाय लोक घराबाहेर पडत नसत. उघड्या डोक्याने बाहेर जाणे शिष्टाचारात बसत नव्हते. तेव्हा काहीजण हौस म्हणून फेटा काढायचे, आता हौस म्हणून घालतात! पण फक्त लग्नात! कधीकधी गणपतीमध्ये, मिरवणुकीतसुद्धा घालतात, नाही असं नाही! लग्नात मात्र हमखास! नशीब एखाद्या ‘लग्नात भेटा’ ऐवजी ‘लग्नात फेटा’ म्हणत नाहीत, एवढे ते अंगवळणी पडलंय.
फेटे घालण्याची पण एक कला आहे. तरबेज माणसं अशी फटक्यासारखी-नव्हे-फेटक्यासारखी फेटा घालतात. हे दृश्य प्रेक्षणीय असते. आमचे आजोबा स्वतःच स्वतःला आरशात न बघता अगदी सुंदर फेटा बांधायचे. आम्ही थक्क होऊन बघायचो. माणूस ती कला आता विसरला. एक मात्र चांगले झाले, या निमित्ताने फेट्यांना एक प्रकारची नवसंजीवनी मिळाली. त्यामुळे आजकालच्या लग्नसमारंभातले दोन प्रमुख विधी म्हणजे ‘फेरे’ आणि ‘फेटे’!
— सुनील भातंब्रेकर
© Sunil Bhatambrekar, Pune
