रंग पांढरा

White — the mother of all colours

‘रंग पांढरा’ as printed in Dainik Sanchar
As printed in Dainik Sanchar (tap to enlarge)

पांढरा रंग! मुळात हा रंग आहे की ह्यावरच दुमत आहे. पांढरं हे असतंच, त्याला वेगळा रंग म्हणून वापरायचा तर पांढऱ्यावर पांढरा कसा वापरायचा? किंवा पांढरा रंग हेच मुळी सर्व रंगांचे मिश्रण आहे तेव्हा तो वेगळा रंग कसा? जाऊ द्या, ह्याच्या तांत्रिक तपशीलात जायलाच नको. काळ्यावर पांढरे करतात तसे पांढऱ्यावर काळे करू!

पांढरा रंग म्हणजे शुभ्र, धवल, श्वेत, सफेद रंग! हे शब्द जरी नुसते डोळ्यासमोर आणले तरी शेकडो दिवे लावल्यासारखा लखलखाट पसरतो! सर्व काही ‘दिसतं’. हे ‘दिसणे’ काहीही न लपवणे - म्हणजेच सत्य दृष्टीस पडणे - म्हणजेच पांढरा रंग!

ह्या रंगाने नावाप्रमाणेच स्वच्छ पांढरे धोतर, सदरा व ठेवणीतला कोट घातला आहे. दोन भुवयांच्यामध्ये ठळक टिळा लावलाय, मिशा कोरलेल्या असून चेहरा कोरा आहे. केस पूर्णपणे पिकलेले असले तरी पगडीमधून त्याचे अंधुकसेच दर्शन होत आहे. पाणीदार डोळ्यातून तो रंग तुमच्याकडे आरपार नजरेने बघत आहे असं वाटतं.

पांढऱ्याचा लोक आदर करतात. मनात कटू, कपटी भाव ठेवून पांढऱ्याशी संगत ठेवता येत नाही. आपले काळे कृत्य हा ठळकपणे दाखवील की काय, याची भीती वाटते. हा रंग संतांप्रमाणे असतो. तुमचे प्रतिबिंब त्याच्यावर निर्भेळ उमटणार ह्याची खात्री असते. पण हा रंग स्थितप्रज्ञ असला तरी वैरागी नाही. ह्याच्याही मनात प्रेम, आपुलकी, दया, माया सगळे काही असते. पण ह्याला व्यक्त व्हायला कोणाची तरी गरज लागते. एकदा सूर जुळले की, ह्या रंगावर डोळे झाकून विश्वास टाकावा, इतका तो आरस्पानी मनाचा आहे.

जर चूक झाली, पराभूत झालो तरी त्याच विश्वासाने तो पराभव स्वीकारण्याची धाडसी वृत्ती ह्या रंगाकडे आहे. कारण ह्याचा मानवतेवर, माणुसकीवर विश्वास आहे. पांढरे निशाण म्हणजे शरणागती हे चूक समीकरण पडले आहे असे वाटते. वास्तविक ते निशाण म्हणजे समोरच्यावर मानवतेच्या उदात्त भावनेने टाकलेला भरवसा आहे. म्हणून पांढरा रंग धोका पचवू शकत नाही. अगदी छोटा आघात ही तो लपवू शकत नाही, इतक्या निर्मळ मनाचा हा रंग आहे.

सूर्याची किरणे सूर्यापासून बाहेर पडताना संपूर्ण पांढरी असतात. सर्वोच्च ज्ञान हे असेच स्वच्छ पांढरे असणार! ह्या पांढऱ्या किरणांचे विघटन होऊनच सप्तरंग तयार होतात. तेव्हा ह्या रंगाला रंगांची जननी म्हणायला हरकत नाही. लहान बाळं जशी आईच्या मांडीवर, खांद्यावर विश्वासाने खेळतातत तसे बाकीचे सारे रंग ह्या शुभ्र मातेच्या अंगावर खेळल्यामुळे खुलून दिसतात. मग ते चित्र असो, लिखाण असो वा अजून काही.

हा रंगही कधीकधी व्यक्त होतो, पण तेही त्याच्या स्वभावाप्रमाणे - स्वच्छ नि सुंदर! पांढऱ्या शुभ्र दुधात तेवढीच पांढरीशुभ्र साखर पडली तर परिणाम गोडच होणार, नाही का?

— सुनील भातंब्रेकर

© Sunil Bhatambrekar, Pune

You may also enjoy

More essays

All writings
ललित विनोद 20 Jul 20262 min read

सर्टिफिकेट

A certificate for everything

मध्यंतरी एकाच्या घरी गेलो होतो. आम्ही गप्पा मारत असतानाच त्याचे ‘इयत्ता तिसरी ब’ - दर्जाचे चिरंजीव शाळेतून घरी आले. आल्या आल्या त्याने दप्तरातून एक सर्टिफिकेट क…

Read essay
नवरंग 19 Oct 20212 min read

रंग करडा

Grey — the silent disciplinarian

करडा रंग हा रंगांमधला सगळ्यात निस्पृह समाजसेवक! नुसता निस्पृह नाही तर मुलखाचा शिस्तीचा. ह्या रंगाने त्याला शोभेशी काळी पॅन्ट व मळखाऊ रंगाचा शर्ट घातलेला आहे. चे…

Read essay
ललित विनोद 25 Nov 20202 min read

भजे

Bhaji — the king of romantic snacks

आपल्या महाराष्ट्रीयन जेवणातल्या प्रत्येक पदार्थाला नुसती वेगळी चवच नसते तर तो पदार्थ मनामध्ये वेगळी रसोत्पत्ति देखील करतो. आता हेच पाहा ना - पोळी, लापशी, साधं व…

Read essay