रंग गुलाबी

Pink — the ever-young colour of love

‘रंग गुलाबी’ as printed in Dainik Sanchar
As printed in Dainik Sanchar (tap to enlarge)

फुलांमध्ये जसं गुलाबाच्या फुलाला आपल्या हृदयात खास जागा आहे, तसं गुलाबी रंगाला रंगांच्या अनोख्या दुनियेत प्रत्येकाच्या मनामनांत अत्यंत अलवार असे  स्थान आहे. याचं कारण गुलाबी रंगांची निर्मितीच मुळे प्रेमभावनेतून तयार झाली आहे. प्रेमाच्या अनंत छटांप्रमाणे गुलाबी रंगाच्याही अनंत छटा आहेत. पण त्या सर्व छटा प्रेमामधील सूक्ष्म बारकावे व अवस्था सांगणाऱ्या आहेत.  हे प्रेम केवळ प्रियकर-प्रेयसीचे प्रेम नसून आई- मुल, भावंडं, मित्र, प्राणी ह्या सर्वांना एकमेकांविषयी वाटणारे असे सर्वसमावेशक प्रेम आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे म्हणजे गुलाबी रंगांचा प्रभाव म्हणजे इतर सर्व दुष्टता, , क्रौर्य, नैराश्य, भीती, सूडत्व अशा सर्व वाईट भावनांच्या रंगांचा अभाव! म्हणून हा रंग अत्यंत नाजूक आहे, मुलायम आहे व निरपेक्ष भावनेने प्रेम करणारा रंग आहे.

गुलाबी रंगाने अतिशय झुळझुळीत, मऊशार, पिसांगत हलकी, कोमल अशी गुलाबी वस्त्रं परिधान केली आहेत. त्याच्या चेहऱ्यावर कमालीचे मधाळ स्मित आहे.  कपाळावर, खांद्यावर पातळ कुरळे केस रुळत आहेत. डोळ्यांत फक्त आणि फक्त निर्विष अशी स्वच्छ प्रेमभावना आहे.  हा रंग अंतर्बाह्य मोहक आहे. असं वाटतं या रंगात तत्क्षणी विरघळुन जाऊन आपणही गुलाबी होऊन जावे. गुलाबी रंगात हे असे दोन मनांचे अद्वैत साधण्याची किमया आहे.

टरारून संपूर्ण फुललेला, पाकळ्यांवर दोन-चार दवबिंदू जमा झालेला, कोवळ्या उन्हामध्ये मस्तपैकी डोलत असलेला गुलाब पाहताक्षणी मनात ज्या अलौकिक, आरस्पानी, अत्युच्च कोटीतल्या भावना मनामध्ये उचंबळून येतात, त्या भावनांचा रंग म्हणजे हा गुलाबी रंग!

गुलाबी रंग पाहायचाच असेल तर तो पाहावा खळाळत हसत चिमुकले हातपाय नाचवीत आईकडे पहाणाऱ्या एखाद्या तान्हुल्याच्या डोळ्यांत, अथांग भक्तीरसामध्ये बुडून जाऊन आर्त अशा सप्तसुरांत ईशस्तवन गाणाऱ्या भक्तांच्या सुरेल गळ्यात, मायेनं लेकरागत प्रत्येक रोपाची काळजी घेत ते शेत वाढवणाऱ्या व जपणाऱ्या शेतकऱ्यांच्या मळ्यात! गुलाबी रंगाचं दर्शन मिळवायला व तो रंग समजायला देखील तो रंग बघणाऱ्यांचं मन असं गुलाबी रंगाचं असावं लागतं.

रात्रभराच्या काळ्याकुट्ट अंधाराला जेव्हा पहाटेचे प्रथम किरण छेद देतात आणि काळोखाचा तो पडदा दूर सारला जातो तेव्हा नवनवोन्मेषशालिनी धरतीला पाहून आकाशाचा रंग उगाच नाही गुलाबी होत! मनोमिलन होऊन धुंद करणारा असा हा गुलाबी रंग!

गुलाबी रंग ही अशी तरल प्रेमभावना जपत आलाय आणि जपत राहणार आहे. त्यामुळे मला हा रंग नेहमी प्रेमाबरोबर मानवतेचाही वाटत आला आहे.

आणि म्हणून जोपर्यंत पृथ्वीवर मानव व इतर प्राणी अस्तित्वात आहेत तोपर्यंत गुलाबी रंग देखील आपले अस्तित्व टिकवून ठेवणार आहे! सर्व रंगांतला एकमेव चिरतरुण,  चिरंजीव असा अलौकिक प्रेमाचा रंग म्हणून!

— सुनील भातंब्रेकर

© Sunil Bhatambrekar, Pune

You may also enjoy

More essays

All writings
ललित विनोद 25 Nov 20202 min read

भजे

Bhaji — the king of romantic snacks

आपल्या महाराष्ट्रीयन जेवणातल्या प्रत्येक पदार्थाला नुसती वेगळी चवच नसते तर तो पदार्थ मनामध्ये वेगळी रसोत्पत्ति देखील करतो. आता हेच पाहा ना - पोळी, लापशी, साधं व…

Read essay
ललित विनोद 18 Nov 20202 min read

भाषण

The art of the endless speech

‘मित्रांनो, असं म्हणतात प्रयत्नांती परमेश्वर असतो - परमेश्वर सृष्टीचा निर्माता आहे - निर्माता दिग्दर्शक नाटकसिनेमाला असतो - दिग्दर्शक चित्रपटाला योग्य दिशा देतो…

Read essay
ललित विनोद 14 Nov 20202 min read

अर्जंट

Everything is urgent

सरांनी तुम्हाला बोलावलंय.. अर्जंट!!’ – शिपाई. ‘त्यांना सांग, मी दुसऱ्या अर्जंट कामांमध्ये अडकलोय’ ‘मी आधीच सांगितलं होतं, ते म्हणाले, त्यांना अर्जंट कुठेतरी जाय…

Read essay