पाढे

पूर्वीच्या काळी पाहुणे किंवा नातेवाईक वगैरे घरी आले की पढवून ठेवल्यासारखा एक प्रश्न हमखास विचारीत, ‘पाढे पाठ आहेत का रे?’ आपण ‘हो’ म्हटलं की  ‘कितीपर्यंत?’ असा पुढचा प्रश्न! ‘पंधरा पर्यंत!!’ असं अभिमानाने सांगितलं की ‘तेराचा म्हणून दाखव पाहू!!’ तो कसाबसा अडखळत संपवला की ‘आता ‘चौदाचा म्हणून दाखव’ असा प्रश्नोपनिषादाचा पाढा चालू होई. कशी तरी सुटका करून घ्यावी लागत असे.

पाढे पाठ करायची एक सुंदर प्रथा का कोण जाणे मागे पडली. ‘बे एके बे’ पासून सुरु होणारे पाढे ‘तीस दाहे तीनशे’ पर्यंत म्हणता येणे ही हुशारीची - पाठांतराची परिसीमा होती. सर्वसाधारण मुलं ‘बारा’पर्यंत तरबेज असत. तेराला पहिली थोडी पडझड व्हायची. चौदा, पंधरा, सोळा हळूहळू का होईना ठीक जायचे. सतरा पासून अजून काही बुरुज ढासळायचे आणि एकोणीसला शरणागतीच्या पांढरे निशाण फडकावले जायचे. वीसला अर्थ नसायचा आणि एकवीसच्या पुढचे पाढे म्हणण्याची हिम्मत करणाऱ्याला लोकोत्तर मुलांमध्ये गणले जातात जात असे.

पण ते काही असो, बाकी सारे गणित विसरले तरी पाढे मात्र आयुष्यभर साथ देतात! ‘आठी साती छप्पन’, ‘बार चोक अठ्ठेचाळ’, ‘पाचा पाचा पंचवीस’ ह्या संथा एखाद्या गाण्याच्या लयीसारख्या मनात कोरल्या गेल्या आहेत.  ‘भीमरूपी’ नंतर ‘महारुद्रा’ यावं किंवा ‘सुखकर्ता’ नंतर ‘दुःखहर्ता’ यावं इतक्या सहजतेने ‘चौदा सक’ नंतर ‘चौऱ्यांशी’ येई. मराठी शिकलेल्या एखाद्या मोठ्या कंपनीच्या चेअरमनच्या तोंडीही ‘अरे, सतरा लाखाला एक मशीन म्हणजे पाच मशीनचे - सतरा पाचा पंच्याऐंशी - म्हणजे एटी फाईव्ह लॅक्स होतील, ’ असा पाढा ऐकू आल्यास आश्चर्य वाटणार नाही.

आजकाल इंग्लिश पाढे म्हणतात, पण ‘फोर सिक्स जा ट्वेंटी फोर’ मध्ये ‘चार सक चोवीस’ची सहजता नाही. बाकी जाऊ द्या, पण कमीतकमी  पाढे तरी मातृभाषेतच हवेत हे आमचं प्रामाणिक मत आहे. अहो, ते आकड्यांची श्लोक आहेत हो! त्यांना तरी इंग्रजीपासून सोडा ना! पूर्वीच्याही पूर्वी पाढे ‘तीस’पर्यंत थांबत नसत. पुढे दिडकी - अडीचकी - औटकी असे. हे म्हणणे डोक्यापेक्षा जिभेसाठी त्रासदायक होते. ‘बे ते दहा’ - छान पायवाट, ‘दहा ते वीस’ - दोनचार खड्डे वाला साधा रस्ता, ‘वीस ते तीस’ - प्रचंड खडबडीत रस्ता आणि दिडकीबिडकी म्हणजे केवळ दगडं अंथरलेला रस्ता, असा तो प्रवास असे.

जर कोणाला स्वतःचं बालपण आठवायचं असेल तर बाकी काही न करता बेशक पाढे म्हणा - बे एक बे, बे दुने चार, बे त्रिक सहा...क्षणात पोहोचता की नाही ही बघा बालपणीच्या रम्य दुनियेत!

— सुनील भातंब्रेकर

© सुनील भातंब्रेकर, पुणे

हेही वाचा

आणखी लेख

सर्व लेख
ललित विनोद १४ नोव्हेंबर २०२०२ मिनिटांचे वाचन

पायरी

बऱ्याच वर्षापूर्वी मी जेव्हा पहिल्यांदा जपानमधील डिस्नेलँडला गेलो होतो. तेव्हा तिथल्या इतर कित्येक आकर्षणाएवढेच तिथल्या पायऱ्यांचं नवल वाटलं होतं. तिथल्या बहुते…

लेख वाचा
ललित विनोद १७ नोव्हेंबर २०२०२ मिनिटांचे वाचन

फेटे लग्नातले

गेल्या काही वर्षात विवाह-समारंभात हे एक तुरावाले फेटे घालायचे काय फॅड आलंय कळत नाही. लग्न लागायच्या तास-दोन तास आधी एका बाजूला हा फेटा घालण्याचा कार्यक्रम चालू…

लेख वाचा
नवरंग १९ ऑक्टोबर २०२१२ मिनिटांचे वाचन

रंग पांढरा

पांढरा रंग! मुळात हा रंग आहे की ह्यावरच दुमत आहे. पांढरं हे असतंच, त्याला वेगळा रंग म्हणून वापरायचा तर पांढऱ्यावर पांढरा कसा वापरायचा? किंवा पांढरा रंग हेच मुळी…

लेख वाचा