अर्जंट
सरांनी तुम्हाला बोलावलंय.. अर्जंट!!’ – शिपाई.
‘त्यांना सांग, मी दुसऱ्या अर्जंट कामांमध्ये अडकलोय’
‘मी आधीच सांगितलं होतं, ते म्हणाले, त्यांना अर्जंट कुठेतरी जायचंय, म्हणून कितीही अर्जंट काम असलं तरी ते सोडून अर्जंट यायला सांगितलंय’ - शिपाई अति शहाणा होता.
मग साहेबांसमोर...
‘अहो, माझं अर्जंट काम आहे, तो मागच्या सहा महिन्यांचा रिपोर्ट अर्जंट पाहिजे. वर अर्जंट पाठवायचा आहे. सध्या कोणतं अर्जंट काम करताहात तुम्ही?’ -
‘साहेब, तुम्हीच दिलेली पाच-सहा अर्जंट कामं चालू आहेत, एक अर्जंट लिस्ट करतोय. तो डेटाही अर्जंटली कंपाईल करतोय.. शिवाय ते...’
‘ते राहू द्या! ते आता अर्जंट नाहीये! हे अर्जंट करा! बाकीचे लोक काय करताहेत?
‘सगळे अर्जंट काम करताहेत काहीतरी! काल-परवा उशिरापर्यंत थांबलो होतो आम्ही सगळे अर्जंट आहे म्हणून!’
‘ठीक आहे! हे अर्जंट काम आहे. उद्या बाकीची अर्जंट कामं करा.. आत्ता हे टॉप अर्जंट द्या!’
- जगातल्या प्रत्येक आस्थापनेमध्ये भाषा वेगळी असली तरी हे असेच घडत आहे. जो-तो अर्जंट कामात गुंतलेला! सावकाश पणे कुणीच काम करत नाही!
ठकाहून महाठक असावे तसे अर्जंटमध्येही टॉप अर्जंट अशी पण एक स्पेशल कॅटेगरी असते. ही अर्जन्सी (मराठीत लिहिल्यामुळे एजन्सी सारखं काहीतरी वाटतं!) प्रत्यक्ष कामापेक्षा ते काम कोणी सांगितले यावर ठरत असते. आपल्याच बरोबरीच्या कोणी एखादी फाईल पाठवून द्यायला सांगितली की त्यांना ‘थांबा हो! कशाला घाई करतोयस? अर्जंट काम करतोय! नंतर पाठवतो’ आणि पाच मिनिटांनी तीच फाईल वरिष्ठांनी मागितली की लगेच शिपायाला ‘अरे, ही फाईल अर्जंट साहेबांना दे! तुझ्या हातात काय आहे? अरे बापरे, जाऊ दे, तुझं काम कर, मीच देतो साहेबांना, अर्जंट आहे!’ झालं! अर्जंट काम तयार झालं!
एखादे काम पूर्ण करणे आणि एखादे अर्जंट काम पूर्ण करणे यात तसा फार मोठा फरक नसतो, पण ते अर्जंट असे प्रिअँबल जोडले की काम करणाऱ्याला आणि ते करून घेणाऱ्यालाही उगाच एक समाधान मिळतं. त्यामुळे ऑफिसमध्ये कुठलंच काम बहुधा साधं नसतं, सगळेच अर्जंट असतात. एखादं काम चुकून सावकाश करायचं असेल तरी ते जोपर्यंत अर्जंट होत नाही तोपर्यंत त्याला कोणी हात लावत नाहीत. आता तुम्हीच स्वतः बघा ना, या क्षणी तुम्ही काही करत नसाल तरी तुमच्या डोक्यातही सावकाश आणि अर्जंट करायच्या कामाची यादी असणार! पण त्यातलं सावकाश करायचं काम तुम्ही आता नाही करणार, तुम्ही फक्त अर्जंट काम करणार! म्हणून जगाचा प्रवास हा असाच असाच चालणार आहे..
‘अर्जंट कामाकडून दुसऱ्या अर्जंट कामाकडे...’
— सुनील भातंब्रेकर
© सुनील भातंब्रेकर, पुणे

