पायरी

Steps, stairs and humility

बऱ्याच वर्षापूर्वी मी जेव्हा पहिल्यांदा जपानमधील डिस्नेलँडला गेलो होतो. तेव्हा तिथल्या इतर कित्येक आकर्षणाएवढेच तिथल्या पायऱ्यांचं  नवल वाटलं होतं. तिथल्या बहुतेक सगळ्या पायऱ्या केवळ दोन-तीन इंच एवढ्याच उंच होत्या. सात-साडेसात इंचांच्या पायऱ्या बघण्याची सवय असलेल्या आपल्या डोळ्यांना ह्या  चिमुकल्या पायऱ्या बघून गंमत वाटली. नंतर उलगडा झाला की ही जागा, त्यात खेळ, त्या वस्तू, या सगळ्या त्या छोट्या पाहुण्यांना समोर ठेवून रचल्या होत्या. त्याचाच एक भाग म्हणून लहान मुलांना चढ-उतार करायला सोप्या अशा त्यांच्या सोयीच्या पायऱ्या बनवल्या होत्या.

आयुष्यात आपण असंख्य पायऱ्या चढतो उतरतो, पण कोणत्यातरी अतिशहाण्या माणसाने ‘शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये’ असे लिहून ठेवून ‘पायरी’ला अग्रस्थानी नेऊन ठेवले आहे. वास्तविक शहाण्या माणसांनी पायरी संदर्भात बऱ्याच गोष्टी करायच्या असतात - किंवा नसतात - जसे की ‘अपयश ही यशाची पहिली पायरी असते’, ‘पायरी वरून पाय घसरू देऊ नये’, ‘एकावेळी एकच पायरी चढणे म्हणजे यश मिळते’ वगैरे पण हे सरळ वाक्प्रचार मागे पडून कोर्टाच्या पायरीने ‘पायरी; शब्दावरचा दावा जिंकून सर्वांवर बाजी मारली.

वयपरत्वे जेव्हा पायऱ्या चढणे कष्टाचे होऊ लागते तेव्हा पायऱ्यांच्या उंची बरोबरच पायऱ्यांची संख्या देखील विचारणीय बाब ठरते. ‘आजी येणार का मंदिरात?’ या प्रश्नाला ती अनुभवी आजी लगेच प्रतिप्रश्न विचारते ‘किती पायऱ्या आहेत?’ तिच्या दृष्टीने पायऱ्यांची संख्या सर्वात महत्त्वाची असते. तो दिवस-मुहूर्त- देवदर्शन सगळं नंतर, आधी ‘किती पायऱ्या?’! साहजिक आहे म्हणा, त्या पायऱ्या चढताना तुम्हाला गुडघेदुखी होऊन त्या पायऱ्यांवरच देव आठवतील, मंदिरात गाभाऱ्यापर्यंत जाऊन देवदर्शन करायची गरजच पडणार नाही असा सुज्ञ विचार ती आजी करते.

मात्र पायरीचा ‘लायकी’शी संबंध लावण्यामागे या जिन्याच्या पायऱ्यांचा हात नसावा (का पाय नसावा?). या ‘लायकी’च्या पायऱ्या म्हणजे पदोन्नतीच्या पायऱ्या असाव्यात. ‘आपली पायरी ओळखून वागावे’ - मधली पायरी ही पदानुक्रमामधली तुमची सद्यःस्थिती असते.

बाकी या पायऱ्या चढल्यावर तुम्हाला कुठे घेऊन जातात यावरून त्या पायऱ्यांचे नामकरण होते. दोन मजली घरांना जिना असतो, रेल्वे पुलावर त्याचा दादरा होतो, भक्तिमार्गावर चढताना त्याचा सोपान होतो, तर यशाकडे नेणारी थोडी अवघड अशी शिडी असते. या शिडीशी यमक जुळणारी माडी मात्र ‘फक्त प्रौढांसाठी’ या सदरात मोडते. या माडीने मात्र पूर्वीच्या कित्येक पिढ्यांना खट्याळ बनवले.

असो. तंत्रज्ञान बदलले. जिने असूनही निरुपयोगी उपयोगी वाटावे ते अशा लिफ्ट उर्फ उद्वाहक आले. पायऱ्या चढण्याउतरण्याच्या कामाऐवजी चक्क व्यायामाचे साधन बनल्या. सार्वजनिक जागी तर ताऱ्यांचे सरकते जिने आले. पायऱ्यासारखे असूनही ते अजिबात न वापरता केवळ त्यावर उभे राहून राहिल्यास तुम्हाला खालून वर किंवा वरून खाली नेणाऱ्या या या जिन्याने माणसाच्या नैसर्गिक विचारशक्तीला सुरुवातीच्या काळात अचंबित केले होते. हळूहळू त्यांची सवय झाली. पण काही झालं तरी पायरी ही गोष्ट तुम्हाला नम्र करते, हे नक्की! देवळात नुसतं पायरीवर मस्तक ठेवलं तरी मनातला अहंभाव क्षणात दूर होतो. उगाच नाही, संत नामदेवांनी आपल्या समाधिसाठी विठ्ठल मंदिराच्या पायरीची निवड केली. लक्ष कळसाकडे असलेले तरी पाय मात्र पायरीवरच असावेत यातच जीवनाचे सार आहे.

— सुनील भातंब्रेकर

© Sunil Bhatambrekar, Pune

You may also enjoy

More essays

All writings
नवरंग 19 Oct 20212 min read

रंग जांभळा

Purple — the colour of the heart

रंगाला जर स्पर्श करता आला असता तर सगळ्यात मुलायम रंग जांभळा लागला असता. जांभळा रंग बनवायला निसर्गाला प्रचंड कष्ट पडले असणार. लाल, काळा, निळा, थोडा गुलाबी, हलकास…

Read essay
भाषा-संस्कृती 13 Nov 20202 min read

शुभहस्ते

By the auspicious hands of…

आपली मराठी भाषा समृद्ध-संपन्न असण्याचे प्रमुख कारण म्हणजे ती संस्कृतोद्भव आहे. त्यामुळे एखाद्या दागदागिन्यांनी नटलेल्या लावण्यवती त्रैलोक्यसुंदरीने साधी रेशमी स…

Read essay
ललित विनोद 8 Nov 20202 min read

चव

Taste

देवाकडे भरपूर काहीतरी मागून देखील, भरपूर जाऊद्या पुरेल एवढेही काही मिळेनासे झाल्यावर आम्ही अंतर्मुख झालो. असे का व्हावे, याचा विचार करताकरता तो वाक्प्रचार कानाव…

Read essay