रंग करडा

Grey — the silent disciplinarian

‘रंग करडा’ as printed in Dainik Sanchar
As printed in Dainik Sanchar (tap to enlarge)

करडा रंग हा रंगांमधला सगळ्यात निस्पृह समाजसेवक! नुसता निस्पृह नाही तर मुलखाचा शिस्तीचा. ह्या रंगाने त्याला शोभेशी काळी पॅन्ट व मळखाऊ रंगाचा शर्ट घातलेला आहे. चेहरा निरुपद्रवी - निराकार. ह्याच्या मनात प्रेम, दया, उन्माद, गूढ असे कुठलेच भाव नसतात - एखाद्या धातूसारखा. त्याच्या भुवया थोड्या वक्र असल्यामुळे तो उगीच रोखून बघतोय असं वाटतं. ओठ मात्र घट्ट मिटलेले असतात, बोलतच नाहीत.

करडा रंग हा असा असतो. तुम्हाला काहीही सांगायचं नसतं, दाखवायचं नसतं, तेव्हा हा रंग मदतीला येतो. हा रंग पाहिल्या पाहिल्या बघणारा उगाच गंभीर होतो. त्याच्यावर प्रतिक्रियाच द्यावी वाटत नाही. टणक लोखंडाने, राखेने, सिमेंटच्या मिश्रणाने, दगडांनी, धोंड्यांनी हा करडा रंग घेतला आहे - ह्यातच त्याची इतर रंगांपासूनची अलिप्तता दिसून येते. ह्याच्या सर्व ह्या भावहीनतेमुळे शिस्तीला ह्या रंगाचे विशेषण वापरतात. बाकी माणसाच्या स्वभावाला रंगाची उपमा देत असल्याचे ‘करडा स्वभाव’ हे एकमेव उदाहरण असावे.

काळा व पांढरा ह्या दोन विरुद्ध टोकाच्या प्रवृत्ती. इतर कोणत्याही भावभावनांना मध्ये न घेता काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा सुवर्णमध्य गाठलेला हा रंग. त्यामुळे त्या दोघांनाही तो आपलासा वाटतो.

मला वाटते, जन्मलेल्या बाळाच्या मनाचा रंग करडा असावा. कारण कुठलेही इतर रंगाचे संस्कार होण्याआधीचा हा रंग आहे. सार्वजनिक ठिकाणी विशेषतः विमानतळांवर जिथे माणसांमाणसांतील अंतर इतर ठिकाणांपेक्षा जास्त असते व उद्देशही कर्तव्यभावनेचाच जास्त असतो, असल्या माणसांच्या भावनांना रंगवायचे असेल तर केवळ करडा रंग वापरावा लागेल. ह्या रंगाच्या मळखाऊ वृत्तीमुळे सर्वांचे दोष, अवहेलना, उपेक्षा स्वतःवर घेणाऱ्या एखाद्या साधूसारखा हा रंग आहे. म्हणूनच तप करणारे साधू हिमालयात अंगाला करड्या रंगाची राख फासून तप करतात. एकंदरीत परित्याग, स्थितप्रज्ञता, थंडगार पण नाही व गरम पण नाही असा कोमट तापमानाचा हा रंग आहे.

ह्या असल्या कोरड्या करड्या रंगाचे भाग्य फक्त एकदा बदलते. आकाशात काळे करडे पाण्याने भरलेले मेघ जमल्यावर! चक्क पाऊस पाडतो तो! एखाद्या कडक, करारी, गंभीर वचक असलेल्या कॉलेजच्या प्राचार्यांनी अचानक शास्त्रीय संगीत गात आलापी घ्यावी असा हा रंग जीवन बरसवतो.

प्रत्येकवेळी करडा माणूस कोरडा असतोच असे नाही. त्याच्यातही भरपूर ओलावा असतो!

— सुनील भातंब्रेकर

© Sunil Bhatambrekar, Pune

You may also enjoy

More essays

All writings
ललित विनोद 20 Jul 20262 min read

सर्टिफिकेट

A certificate for everything

मध्यंतरी एकाच्या घरी गेलो होतो. आम्ही गप्पा मारत असतानाच त्याचे ‘इयत्ता तिसरी ब’ - दर्जाचे चिरंजीव शाळेतून घरी आले. आल्या आल्या त्याने दप्तरातून एक सर्टिफिकेट क…

Read essay
नवरंग 19 Oct 20212 min read

रंग पिवळा

Yellow — radiance and wisdom

आकाशकंदिलाप्रमाणे प्रत्येक भिंतींना उठून दिसेल (‘-म्हणजे तशी बसूनही दिसेल म्हणा’ - ही लाखवेळेला वापरलेली कोटी, कोटीवेळेला वापरली जावी म्हणून इथे वापरली आहे.) अस…

Read essay
भाषा-संस्कृती 25 Oct 20203 min read

काना मात्रा वेलांटी उकार

The jewellery of the Devanagari script

जगात जशा शेकडो बोलीभाषा आहेत तशाच शेकडो लिप्या पण आहेत. त्यात आपल्या देवनागरी पासून ते लॅटिन रोमन व्हाया मंडेरिन, कांजी, काताकाना, हिरागाना, अरेबिक अशा असंख्य ल…

Read essay