धडक पक्ष्यांची

‘झुंजूमुंजू झालं. पूर्वेला तांबडं फुटलं. झाडाच्या एका फांद्यावर रात्रभर पायात फांदी घट्ट पकडून निजलेल्या पाखरांनी डोळे उघडले. चिमण्या उठल्या, कावळे उठले, कबुतरं उठली, पोपट उठले. पंख फडफडवीत अंग मोकळे केले. चोचा उघडीत चिवचिवाट, किलबिलाट केला. दोन-पाच मिनिटांनी एका पाठोपाठ एकाने आकाशात झेप घेतली. सगळीकडे एकच कल्लोळ झाला. आकाशात पक्ष्यांचे थवेच्या थवे उडू लागले.’

इथपर्यंत ठीक आहे. आम्ही क्षणभर विचार केला, ह्या पक्ष्यांच्या वर्णनात मानवी अंश घुसला तर काय होईल? वर्णन पुढे चालू....

‘…पक्ष्यांचे थवेच्या थवे उडू लागले. पण तेवढ्यात कावळा उडत असलेल्या वाटेने कबुतराला जायचे होते. कावळा शहाणा होता. त्याने कबुतराला कावकाव अशा आवाजात थांबथांब म्हटले. पण कबुतराने ऐकले नाही. सरळ कावळ्याला हवेतच धडक मारली. कावळा क्षणभर कोलमडला, कसातरी सावरला. तिकडे साळुंकी बसलेल्या तारेवरच पोपटाला बसायचे होते. त्याने मागनं येऊन साळुंकीला तारेवरून ढकलून दिले. साळुंकी पाच-दहा फूट खाली पडली. कशीतरी सावरून उडू लागली. दुसरीकडे चिमण्यांचे चार-पाच घरातले थवे एकदम एकाच झाडाकडे निघाले. बंगलेवाल्या चिमणीने छोट्या घरातल्या चिमणीला जोरदार धक्का देऊन हवेतच पाडले. ते पाहून चिमणा चिडला. त्याने उडत जाऊन त्या चिमणीचे घर मोडले. नशीब आत पिल्लं नव्हती.

बाजूला जमिनीवर कोंबड्या जमिनीवरचे किडूकमिडूक खात होत्या. एकच किडा दोन कोंबड्यांना खायचा होता. दोघी एकदम त्या किड्यावर तुटून पडल्या. किडा उडून गेला. कोंबड्याने एक पाय हवेत उंचावत दुसऱ्या कोंबड्याच्या गालावर जोरदार चापट मारली..

सगळीकडे आकाशात पक्ष्यांच्या धडका सुरू झाला. त्यातल्या काही चुकून होत्या आणि काही मुद्दाम मारलेल्या होत्या. पक्षी जखमी होऊ लागले. माणसं चिडली!’

वर्णन समाप्त. असं घडतं का? तर नाही! रोज आकाशात पाहा - शेकडो पक्षी एकाच आकाशाच्या परिघात, क्षेत्रात उडत असतात. बरं, हे उडणं सावकाश नसतं. बाणाच्या वेगाने सुसाट असतं. पण कधीही पक्षी एकमेकांना धडकत नाहीत.

पक्ष्यांविषयी त्यांच्या स्थलांतराविषयी एवढंच काय त्यांच्या मृत्यूविषयी सर्वसामान्यांना कायम गूढता वाटत आलीय. त्यात त्यांचे हे शिस्तबद्ध उडणे पण आहे. त्यांची संख्या एवढी असूनही कुठला पक्षी उपासमारीने मरत नाही अथवा कुठला पक्षी खाऊन जाडजूडही होत नाही. कुणी लंगडत उडत नाही की, कुणी उगाच स्पर्धा लावून फुशारकी मारत नाहीत.

मानवाच्या संपर्कात राहूनही पक्ष्यांनी आपले पक्षीपण सोडले नाही. असं म्हणतात, काही माणसांना पक्ष्यांची भाषा कळते. पण पक्ष्यांना माणसांची भाषा नक्कीच कळत नसणार, हे पक्ष्यांचे केवढे भाग्य!

— सुनील भातंब्रेकर

© सुनील भातंब्रेकर, पुणे

हेही वाचा

आणखी लेख

सर्व लेख
ललित विनोद २५ नोव्हेंबर २०२०२ मिनिटांचे वाचन

भजे

आपल्या महाराष्ट्रीयन जेवणातल्या प्रत्येक पदार्थाला नुसती वेगळी चवच नसते तर तो पदार्थ मनामध्ये वेगळी रसोत्पत्ति देखील करतो. आता हेच पाहा ना - पोळी, लापशी, साधं व…

लेख वाचा
भाषा-संस्कृती २५ ऑक्टोबर २०२०३ मिनिटांचे वाचन

काना मात्रा वेलांटी उकार

जगात जशा शेकडो बोलीभाषा आहेत तशाच शेकडो लिप्या पण आहेत. त्यात आपल्या देवनागरी पासून ते लॅटिन रोमन व्हाया मंडेरिन, कांजी, काताकाना, हिरागाना, अरेबिक अशा असंख्य ल…

लेख वाचा
भाषा-संस्कृती १५ नोव्हेंबर २०२०२ मिनिटांचे वाचन

पाढे

पूर्वीच्या काळी पाहुणे किंवा नातेवाईक वगैरे घरी आले की पढवून ठेवल्यासारखा एक प्रश्न हमखास विचारीत, ‘पाढे पाठ आहेत का रे?’ आपण ‘हो’ म्हटलं की ‘कितीपर्यंत?’ असा प…

लेख वाचा