काना मात्रा वेलांटी उकार

जगात जशा शेकडो बोलीभाषा आहेत तशाच शेकडो लिप्या पण आहेत. त्यात आपल्या  देवनागरी पासून ते लॅटिन रोमन व्हाया मंडेरिन, कांजी, काताकाना, हिरागाना, अरेबिक अशा असंख्य लिप्या आपल्याला ज्ञात आहेत. कुठेतरी, केव्हातरी आपल्या डोळ्याखालून त्या जात असतात.

पण शेवटी ‘आपला तो बाब्या‘च! म्हणून मला आपली देवनागरी लिपीच सहाजिक प्रिय आहे. परंतु ही लिपी नुसती आपली आहे म्हणून प्रिय नाही तर त्या लिपीच्या सजावटीमुळे सौंदर्यामुळे माझ्या डोळ्यांना ती सुखावते! ह्या लिपीच्या सजावटीचे प्रमुख दागिने म्हणजे त्या लिपीतले काना, मात्रा, वेलांटी, उकार वगैरे स्वरांश चिन्हे! थोडी चित्रकलेची, अक्षर-लेखनाची आवड असणाऱ्यांना विचारून पहा या स्वरांशामुळे त्यांच्या प्रतिभेला केवढी आव्हाने दिली आहेत!

त्यातला ‘काना’ हा सरळसोट दोन कानावाला शब्द असला तरी ट, ठ, ड, ढ, र,  ह, ळ सारख्या  अक्षरांशेजारी तो जेव्हा येतो तेव्हा त्या अक्षरांना आधार मिळाल्यासारखे वाटते. देवनागरीतली सगळीच अक्षरे दोरीवर वाळत घातलेल्या कपड्यांसारखी किंवा दरवाजावरच्या तोरणासारखी एक प्रकारे ऊर्ध्वरेखित असतात, त्यामुळे ती बाकीच्या लिप्यासारखी वादळवाऱ्यात सैरावैरा धावून भटकतील अशी भिती नसते. तरीही एखाद्या माणसांच्या हातात सहज म्हणून धरलेली, जमिनीवर टेकणारी काठी असली की ती काठी घेणाऱ्याला व बघणार्‍याला कसं हायसं वाटतं, तसा तो काना हायसं आणतो.

स्वतः ‘मात्रा’ या शब्दात जरी फक्त दोन काना असून मात्रा नसली तरी मात्रा दिल्यानंतर त्या अक्षरांच्या उच्चारातले तिरपेपण ते अक्षर खुलवते. भगवान श्रीकृष्णाने डोक्यात छानपैकी मोरपीस खोचावे तशी ही मात्रा असते. एका पिसाने समाधान होत नसेल तर दोन पिसे म्हणजे दोन मात्रा कशा ऐटबाज दिसतात! या मात्रा केवळ डोळ्यांना सुखावत नाहीत तर कानांनाही (खरे कान बरं का!) तो शब्द ‘ऐक्य’ करतात. ‘पंजा’ या भितीदायक शब्दाचे केवळ दोन मात्रा आल्या कि छान वाजणारे ‘पैंजण’ होते, साध्या ‘करी’ची तोंडाला पाणी आणणारी ‘कैरी’ होते! अशा सुंदर मात्रांपुढे कोणाची मात्रा चालणार? इंग्रजी मधली 'डल' अक्षरं केवळ 'ड' वर दोन मात्रा आणि काना दिल्यामुळे कशी ‘डौलदार’ होतात.

त्यानंतरचा उकार - मग तो ऱ्हस्व असो किंवा दीर्घ - रामभक्त हनुमानाच्या शेपटी सारखी त्याची लयदार वळणे व आकार हे त्या अक्षरांची उंची - प्रत्यक्षात व लौकीकार्थात - दोन्ही प्रकारे वाढवतो. उकार हे कधीकधी अक्षरांसाठी झाडाच्या मुळासारखे वाटतात. झाडांच्या मुळांप्रमाणे ते मूळ जोपर्यंत पाणी शोषून वर झाडाकडे पाठवत नाही तोपर्यंत फूल उमलत नाही. त्याच प्रमाणे हे सुंदर महिरपीसारखे उकार अक्षरांना मस्त उमलवतात, हे मात्र नक्की!

वेलांटी तर स्वरांशामधला शिरोमणी! जेवढी वेलांटी भारी व फुगीर तेवढी त्या अक्षर-लेखकाची सौंदर्यदृष्टी अलौकिक अशी साधी भूमिती आहे. अक्षर-लेखनात एखाद्या पगडीसारख्या आकाराच्या ह्या वेलांटीने साधा माणूसही लगेच ‘अधिकारी’ बनतो. देवलोकात 'देवी' म्हटलं कि शेवटी वेलांटी ही आलीच, त्यामुळे वेलांटीला जननी स्वरूप मानायलाही हरकत नाही.

ह्या शिवाय अनुस्वार, रफार, विसर्ग ही चिन्हे देखील अक्षरांना अजून पूर्णतः आणि अप्रतिम सजवतात, त्यामुळे देवनागरीतले लिखाण हे ‘हिरेजडित मुगूट शोभतो बरा’ अशा श्रीमंत व प्रसन्न परमेश्वरा सारखे वाटते. एवढी सौंदर्य-लेणी इतर लिपीत नक्कीच नसावीत. काय सांगावे, या विविध स्वरांश चिन्हाने नटल्यामुळेच या लिपीला ईश्वर-स्वरूप असे ‘देवनागरी’ हे नाव पडले असावे! खरं की नाही?

— सुनील भातंब्रेकर

© सुनील भातंब्रेकर, पुणे

हेही वाचा

आणखी लेख

सर्व लेख
नवरंग १९ ऑक्टोबर २०२१२ मिनिटांचे वाचन

रंग केशरी

केशरी ह्या रंगाची एक गंमत आहे. बाकी रंगांचे रंगांच्या वापरानुसार नाव बदलले. लाल रंग कपाळावर लावला की, गंध किंवा टिळा होतो. भुकटीला वापरला की, त्याचा गुलाल होतो.…

लेख वाचा
ललित विनोद १८ नोव्हेंबर २०२०२ मिनिटांचे वाचन

भाषण

‘मित्रांनो, असं म्हणतात प्रयत्नांती परमेश्वर असतो - परमेश्वर सृष्टीचा निर्माता आहे - निर्माता दिग्दर्शक नाटकसिनेमाला असतो - दिग्दर्शक चित्रपटाला योग्य दिशा देतो…

लेख वाचा
ललित विनोद २० जुलै २०२६२ मिनिटांचे वाचन

सर्टिफिकेट

मध्यंतरी एकाच्या घरी गेलो होतो. आम्ही गप्पा मारत असतानाच त्याचे ‘इयत्ता तिसरी ब’ - दर्जाचे चिरंजीव शाळेतून घरी आले. आल्या आल्या त्याने दप्तरातून एक सर्टिफिकेट क…

लेख वाचा