रंग जांभळा

दैनिक संचारमध्ये प्रसिद्ध झालेला ‘रंग जांभळा’
दैनिक संचारमध्ये प्रसिद्ध झालेले मूळ पान (मोठे पाहण्यासाठी टॅप करा)

रंगाला जर स्पर्श करता आला असता तर सगळ्यात मुलायम रंग जांभळा लागला असता. जांभळा रंग बनवायला निसर्गाला प्रचंड कष्ट पडले असणार. लाल, काळा, निळा, थोडा गुलाबी, हलकासा किरमिजी, तपकिरी अशा बऱ्याच रंगांचे मिश्रण केल्यानंतर जसे एखादे स्वयंपाकघरातले व्यंजन बनावे, तसा हा जांभळा रंग बनला आहे; जणू विविध प्रकारचे मसाले, हळद, तिखट, नैसर्गिक रंग टाकून एक अत्यंत सुंदर चविष्ट पदार्थ बनवावा! अतिशय संवेदनशील, भावनोत्कट, कवी मनाच्या व खूप सर्जनशील वृत्तीच्या लोकांचा हा आवडता रंग असतो, तो त्यामुळे!

जांभळा रंग माणसामाणसातले अंतर कमी करतो. भिंतीला हा रंग असेल तर त्या खोलीत बसून बोलणाऱ्याला अंतरीचे गुह्य सांगावेसे वाटते. ही त्या रंगाची जादू आहे. हृदय सर्वांनी बघितलंय, त्याचा रंगही सगळ्यांना माहिती आहे. लाल, गुलाबी रंगाचे ते मिश्रण असते. पण अंतःकरण कोणीच पाहिलं नाही. कारण ती एक भावना आहे. म्हणून मला वाटते की, उद्या जर अंतःकरणाचा रंग कुठला असा प्रश्न पडला तर बिनधास्तपणे सांगा - जांभळा! दुसरा असूच शकत नाही!

ह्या जांभळ्याची बातच न्यारी असते. चार लोकांत आपल्या वेगळेपणाने उठून दिसणाऱ्या, भेटल्या भेटल्या तुम्हाला हलकिशी मिठी मारून डोळ्यात डोळे घालून तुमच्या खांद्यावर मैत्रीचा आश्वासन हात ठेवून दिलखुलास स्मित करत, तुमचा चिंताक्रांत चेहरा बघून, ‘काय अडचण आहे सांग तू यार! मी आहे ना ती सोडवायला!’ असं थेट हृदयातून बोलून, तुमच्या मनाचे पदर उघडायला लावणाऱ्या जीवलग मित्रासारखा हा जांभळा रंग आहे. हा लाखात एकच असतो. निळ्या, हिरव्या रंगासारखा कुठेही नजर टाकल्यावर दिसणाऱ्या रंगासारखा हा रंग नाही.

असं वाटतं की, जांभळा रंग सगळं शोषून घेतो आणि स्वतःच्या पोटात ठेवतो. जांभळ्या रंगाशी बोललं तर एखाद्या विश्वासू मित्र-मैत्रिणीशी बोलल्यासारखं वाटतं. मन हलकं करणारा हा रंग आहे. लहान बाळाचे अंगडे-टोपडे हे हमखास जांभळ्या रंगाचे असतात. आईवरच्या विश्वासाने त्या जांभळ्या कपड्यात बाळ बिनधास्त झोपी जातं.

नारंगीसारखं रंगावरूनच नाव पडलेलं जांभूळ हे छोटेखानी फळ त्याच्या रंगाप्रमाणेच हटके चवीसाठी ओळखलं जातं. कोणीतरी जांबुकासव बनवून जांभळाला बाटलीत बंद केलं. पण ते काही खरे नाही.

असा हा मुलायम, प्रेम करायला शिकवणारा, अंतरंगाला हात घालणारा, मनाने श्रीमंत असणारा, राजा-महाराजांच्या मुगुटात व त्यांच्या पेहरावातच शोभणारा जांभळा रंग रंगाचा राजा - नव्हे - महाराजा आहे...!

— सुनील भातंब्रेकर

© सुनील भातंब्रेकर, पुणे

हेही वाचा

आणखी लेख

सर्व लेख
ललित विनोद २५ नोव्हेंबर २०२०२ मिनिटांचे वाचन

भजे

आपल्या महाराष्ट्रीयन जेवणातल्या प्रत्येक पदार्थाला नुसती वेगळी चवच नसते तर तो पदार्थ मनामध्ये वेगळी रसोत्पत्ति देखील करतो. आता हेच पाहा ना - पोळी, लापशी, साधं व…

लेख वाचा
नवरंग १९ ऑक्टोबर २०२१२ मिनिटांचे वाचन

रंग लाल

जवळपास प्रत्येकाने रंगासाठी त्या रंगाच्या पुढे एक रंग विशेषण लावतात, उदा. पिवळाधमक, हिरवाजर्द, निळंशार, काळाकुट्ट वगैरे. त्यात ‘लाल’च्या पुढे ‘भडक’ वापरतात. म्ह…

लेख वाचा
ललित विनोद १८ नोव्हेंबर २०२०२ मिनिटांचे वाचन

भाषण

‘मित्रांनो, असं म्हणतात प्रयत्नांती परमेश्वर असतो - परमेश्वर सृष्टीचा निर्माता आहे - निर्माता दिग्दर्शक नाटकसिनेमाला असतो - दिग्दर्शक चित्रपटाला योग्य दिशा देतो…

लेख वाचा