रंग निळा

दैनिक संचारमध्ये प्रसिद्ध झालेला ‘रंग निळा’
दैनिक संचारमध्ये प्रसिद्ध झालेले मूळ पान (मोठे पाहण्यासाठी टॅप करा)

निळसर शुभ्र चंद्रावर प्रथम पाऊल टाकल्यावर नील (!) आर्मस्ट्राँगने जेव्हा पृथ्वीकडे पाहिले असणार तेव्हा पृथ्वीचा निळा रंग पाहून त्याचे डोळे नक्की चमकले असणार. निळ्या रंगाचा तो अवकाश व्यापून टाकणारा सोहळा निळ्या रंगाची अथांगता दर्शवणारा ठरला असावा.

‘तानापिहिनिपाजा’ मधला हा माझा सगळ्यात आवडता रंग! देवांचा देव महादेवांचा हा रंग. नजरेत न मावणारा. ह्या रंगाची डोळ्यात न मावणारी अथांगता बघायची असेल तर विमानातून दिवसा उजेडी विमान उंच गेल्यावर खिडकीतून बघावे. त्या निळाईत न्हाऊन जातो आपण. क्षणभर ते विमान, उंची, आकाश सगळे विसरा आणि स्वतःला त्या निळाईत झोकून द्या. समाधीच शेवटच्या तुर्यावस्थेत जाऊन आत्म्याचे परमात्म्याशी संयोग होऊन एक प्रकारची उन्मनी अवस्था प्राप्त होते. दिव्य प्रकाश - जो समाधिवस्थेतच दिसतो - हा नक्कीच निळ्या रंगाचा असणार. अथांगता, गहनता ह्या निळ्या रंगाच्या वैशिष्ट्यामुळे आकाशाप्रमाणेच समुद्रानेही निळाई पांघरलेली असते. निळा रंग सहा-साडेसहा फूट उंचीच्या बलदंड शरीरयष्टीच्या, आपली शुभ्र दंतपक्ती दाखवत प्रसन्नपणे हसणाऱ्या, आपले लांबसडक बाहू पसरून आपल्याला आश्वस्त करत कवेत घेण्यासाठी आमंत्रित करणाऱ्या महापुरुषाप्रमाणे वाटतो.

निळा रंग विरघळवणारा रंग आहे. म्हणून सगळ्या रंगाची ओढ निळ्या रंगाकडे असते. मृत्यू हा नक्कीच काळा नसावा,  तो तरल अवस्थेत नेणारा गूढ, गहन, अथांग निळा असावा असे मला नेहमी वाटते. त्यामुळे निळा रंग माणसाला नम्र बनवतो. अंतर्मुख व्हायला लावतो. मनात कुठेतरी ज्ञानाची आस तयार करतो. जेव्हा समुद्रात आपण खोल शिरतो तेव्हा तिथले ते पारदर्शक निळेशार पाणी, स्फटिकाप्रमाणे मधूनच चमकणारे नीलकिरण समुद्राची अथांगता अजूनच खोल व ठळकपणे अधोरेखित करतात. ‘पाण्या, तुझा रंग कसा’ हा चिरंतन प्रश्न जर खरं पाण्यालाच विचारला तर पाणी नक्कीच ‘निळा!’ असं आनंदून सांगेल.

आकाश, हवा, तेज, जल, पृथ्वीपैकी हवा ही रंगहीन समजली तर उरलेल्या चारपैकी तीन तत्त्व तर निळेच आहेत. त्यामुळे ‘माती असशी मातीत मिसळशी’ला जर रंगाच्या संदर्भात सांगायचे असेल तर ‘निळा असशी निळयात मिसळशी’ असेच म्हणावे लागेल. रात्रीच्या चंद्राच्या निळसर प्रकाशात तर हे अंतःकरणपूर्वक जाणवते.

उत्तुंग प्रतिभा लाभलेल्या महान क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकरांनाही जेव्हा खाली अथांग निळा समुद्र व माथ्यावर तेवढेच अथांग आकाश बघून म्हणूनच पुढील अजरामर काव्य सुचले -

सुनील नभ हें, सुंदर नभ हें, नभ हे अतल अहा

सुनील सागर, सुंदर सागर, सागर अतलीच  हा।

असा हा सुंदर निळा रंग ह्याहून अधिक कोणाला समजला, भावला असेल?

— सुनील भातंब्रेकर

© सुनील भातंब्रेकर, पुणे

हेही वाचा

आणखी लेख

सर्व लेख
नवरंग १९ ऑक्टोबर २०२१२ मिनिटांचे वाचन

रंग गुलाबी

फुलांमध्ये जसं गुलाबाच्या फुलाला आपल्या हृदयात खास जागा आहे, तसं गुलाबी रंगाला रंगांच्या अनोख्या दुनियेत प्रत्येकाच्या मनामनांत अत्यंत अलवार असे स्थान आहे. याचं…

लेख वाचा
ललित विनोद २० जुलै २०२६२ मिनिटांचे वाचन

धडक पक्ष्यांची

‘झुंजूमुंजू झालं. पूर्वेला तांबडं फुटलं. झाडाच्या एका फांद्यावर रात्रभर पायात फांदी घट्ट पकडून निजलेल्या पाखरांनी डोळे उघडले. चिमण्या उठल्या, कावळे उठले, कबुतरं…

लेख वाचा
नवरंग १९ ऑक्टोबर २०२१२ मिनिटांचे वाचन

रंग केशरी

केशरी ह्या रंगाची एक गंमत आहे. बाकी रंगांचे रंगांच्या वापरानुसार नाव बदलले. लाल रंग कपाळावर लावला की, गंध किंवा टिळा होतो. भुकटीला वापरला की, त्याचा गुलाल होतो.…

लेख वाचा