रंग पिवळा

दैनिक संचारमध्ये प्रसिद्ध झालेला ‘रंग पिवळा’
दैनिक संचारमध्ये प्रसिद्ध झालेले मूळ पान (मोठे पाहण्यासाठी टॅप करा)

आकाशकंदिलाप्रमाणे प्रत्येक भिंतींना उठून दिसेल (‘-म्हणजे तशी बसूनही दिसेल म्हणा’ - ही लाखवेळेला वापरलेली कोटी, कोटीवेळेला वापरली जावी म्हणून इथे वापरली आहे.) असे रंग लावण्याची प्रथा आहे. ती तशी पडण्याआधी घराच्या सगळ्या भिंतींना पिवळा हा एकच रंग वापरत असत. ‘भिंत म्हटली की पिवळी’ हे ‘आकाश म्हणजे निळा’ एवढे नैसर्गिक वाटावे असे रूढ होते. असे का? - तर घरात ताजेपणा हवा, प्रसन्न वातावरण हवे, प्रकाश हवा, ऊर्जा हवी म्हणून! म्हणून पिवळा रंग हा प्रखर ऊर्जेचा, देदीप्यमानतेचा आहे. ज्या तेजापुढे नुसते डोळे दिपत नाहीत तर चटकेही बसतात अशा सूर्याचा रंग पिवळा आहे. एखाद्याला भस्म करून टाकणाऱ्या पंचमहाभूतांपैकी तेजाचा, ज्वाळांचा रंग पिवळा असतो त्यामुळेच.

पिवळा रंग म्हटलं की, डोळ्यासमोर महातेजस्वी, ज्ञानी, पाणीदार डोळे, रेखीव पिळदार अंगकाठी, अत्यंत नितळ व तळपणारी त्वचा, नीटनेटके व व्यवस्थित घातलेले सोनेरी काठांचे परीटघडीचे शुभ्र धोतर, कपाळावर दुबोटी गंध, गळ्यात एकच छोट्या मण्यांची माळ घातलेला हलके स्मित करत असलेला सिद्ध पुरुष समोर येतो. पिवळ्या रंगासमोर आपोआप हात जोडले जातात.

पिवळा रंग केवळ ज्ञान, तेज दर्शवत नाही, धनही दर्शवतो. लक्ष्मीच्या हातातला भालाही पिवळा असतो आणि तिच्या हातातून पडणाऱ्या मोहराही पिवळ्या असतात. उगाच नाही धातूंच्या  राजाने - म्हणजे सोन्याने - पिवळा रंग घेतला आहे. तसे पितळही पिवळेच असते, म्हणून लोखंडापेक्षा जास्त भाव खाते.

ह्या रंगाची प्रसन्नता ओळखूनच झेंडूसारख्या फुलांना व आंब्यासारख्या फळांनाही पिवळा रंग मिळालेला असावा. एकंदरीतच हा राजा रंग. गुलाब जरी मुळचा गुलाबी असला तरी पिवळ्या गुलाबाची शानच वेगळी.

कधीकधी संध्याकाळी आकाशात पश्चिमेला रंगाची अशी संगती जमते आणि पिवळ्या रंगाची उधळण संपूर्ण आसमंतावर पसरते. सर्व परिसर सोन्यासारखा चमकू लागतो आणि मन आनंदाने उचंबळून येते. पिवळ्या रंगाची ही किमया असते.

म्हणूनच पहा ना, घरातील पूजेचे ठिकाण, देवघरामध्ये सारे काही पिवळे असते. देवाच्या मूर्ती, त्यांच्यासमोर फोटोमध्ये पिवळ्या रंगाचे सुवर्णहार व दागिने, पिवळा मुकूट, पितांबर, समोर पिवळ्या रंगाची घंटा व समया, त्यामध्ये पिवळ्या रंगाची प्रखर ज्योत व त्याचा सर्व घरावर पसरलेला मंद पिवळा प्रकाश. कोणालाही नतमस्तक व्हावे वाटेल. आता खुद्द परमेश्वराने पिवळा रंग स्वीकारल्यावर बाकीच्या रंगांना त्याची शोभा वाढवायला का नाही आवडणार?

— सुनील भातंब्रेकर

© सुनील भातंब्रेकर, पुणे

हेही वाचा

आणखी लेख

सर्व लेख
नवरंग १९ ऑक्टोबर २०२१२ मिनिटांचे वाचन

रंग केशरी

केशरी ह्या रंगाची एक गंमत आहे. बाकी रंगांचे रंगांच्या वापरानुसार नाव बदलले. लाल रंग कपाळावर लावला की, गंध किंवा टिळा होतो. भुकटीला वापरला की, त्याचा गुलाल होतो.…

लेख वाचा
ललित विनोद १२ नोव्हेंबर २०२०२ मिनिटांचे वाचन

आग्रह

तरी सर्वांनी कार्यक्रमाला हेच आग्रहाचे निमंत्रण समजून यावे ही विनंती’ असा मजकूर असलेली आग्रह या संकल्पनेला मान देणारी निमंत्रण पत्रिका आजकाल खूपदा बघायला मिळते.…

लेख वाचा
नवरंग १९ ऑक्टोबर २०२१२ मिनिटांचे वाचन

रंग हिरवा

‘हिरवे हिरवेगार गालिचे। हरिततृणाच्या मखमालीवरचे।’ बालकवींच्या ह्या अजरामर कवितेत हिरव्या रंगाच्या पार्श्वभूमीवर रविकर व फुलराणीच्या अनोख्या विवाहसोहळ्याचे अत्यं…

लेख वाचा