रंग करडा

दैनिक संचारमध्ये प्रसिद्ध झालेला ‘रंग करडा’
दैनिक संचारमध्ये प्रसिद्ध झालेले मूळ पान (मोठे पाहण्यासाठी टॅप करा)

करडा रंग हा रंगांमधला सगळ्यात निस्पृह समाजसेवक! नुसता निस्पृह नाही तर मुलखाचा शिस्तीचा. ह्या रंगाने त्याला शोभेशी काळी पॅन्ट व मळखाऊ रंगाचा शर्ट घातलेला आहे. चेहरा निरुपद्रवी - निराकार. ह्याच्या मनात प्रेम, दया, उन्माद, गूढ असे कुठलेच भाव नसतात - एखाद्या धातूसारखा. त्याच्या भुवया थोड्या वक्र असल्यामुळे तो उगीच रोखून बघतोय असं वाटतं. ओठ मात्र घट्ट मिटलेले असतात, बोलतच नाहीत.

करडा रंग हा असा असतो. तुम्हाला काहीही सांगायचं नसतं, दाखवायचं नसतं, तेव्हा हा रंग मदतीला येतो. हा रंग पाहिल्या पाहिल्या बघणारा उगाच गंभीर होतो. त्याच्यावर प्रतिक्रियाच द्यावी वाटत नाही. टणक लोखंडाने, राखेने, सिमेंटच्या मिश्रणाने, दगडांनी, धोंड्यांनी हा करडा रंग घेतला आहे - ह्यातच त्याची इतर रंगांपासूनची अलिप्तता दिसून येते. ह्याच्या सर्व ह्या भावहीनतेमुळे शिस्तीला ह्या रंगाचे विशेषण वापरतात. बाकी माणसाच्या स्वभावाला रंगाची उपमा देत असल्याचे ‘करडा स्वभाव’ हे एकमेव उदाहरण असावे.

काळा व पांढरा ह्या दोन विरुद्ध टोकाच्या प्रवृत्ती. इतर कोणत्याही भावभावनांना मध्ये न घेता काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा सुवर्णमध्य गाठलेला हा रंग. त्यामुळे त्या दोघांनाही तो आपलासा वाटतो.

मला वाटते, जन्मलेल्या बाळाच्या मनाचा रंग करडा असावा. कारण कुठलेही इतर रंगाचे संस्कार होण्याआधीचा हा रंग आहे. सार्वजनिक ठिकाणी विशेषतः विमानतळांवर जिथे माणसांमाणसांतील अंतर इतर ठिकाणांपेक्षा जास्त असते व उद्देशही कर्तव्यभावनेचाच जास्त असतो, असल्या माणसांच्या भावनांना रंगवायचे असेल तर केवळ करडा रंग वापरावा लागेल. ह्या रंगाच्या मळखाऊ वृत्तीमुळे सर्वांचे दोष, अवहेलना, उपेक्षा स्वतःवर घेणाऱ्या एखाद्या साधूसारखा हा रंग आहे. म्हणूनच तप करणारे साधू हिमालयात अंगाला करड्या रंगाची राख फासून तप करतात. एकंदरीत परित्याग, स्थितप्रज्ञता, थंडगार पण नाही व गरम पण नाही असा कोमट तापमानाचा हा रंग आहे.

ह्या असल्या कोरड्या करड्या रंगाचे भाग्य फक्त एकदा बदलते. आकाशात काळे करडे पाण्याने भरलेले मेघ जमल्यावर! चक्क पाऊस पाडतो तो! एखाद्या कडक, करारी, गंभीर वचक असलेल्या कॉलेजच्या प्राचार्यांनी अचानक शास्त्रीय संगीत गात आलापी घ्यावी असा हा रंग जीवन बरसवतो.

प्रत्येकवेळी करडा माणूस कोरडा असतोच असे नाही. त्याच्यातही भरपूर ओलावा असतो!

— सुनील भातंब्रेकर

© सुनील भातंब्रेकर, पुणे

हेही वाचा

आणखी लेख

सर्व लेख
ललित विनोद १२ नोव्हेंबर २०२०२ मिनिटांचे वाचन

आग्रह

तरी सर्वांनी कार्यक्रमाला हेच आग्रहाचे निमंत्रण समजून यावे ही विनंती’ असा मजकूर असलेली आग्रह या संकल्पनेला मान देणारी निमंत्रण पत्रिका आजकाल खूपदा बघायला मिळते.…

लेख वाचा
ललित विनोद १७ नोव्हेंबर २०२०२ मिनिटांचे वाचन

फेटे लग्नातले

गेल्या काही वर्षात विवाह-समारंभात हे एक तुरावाले फेटे घालायचे काय फॅड आलंय कळत नाही. लग्न लागायच्या तास-दोन तास आधी एका बाजूला हा फेटा घालण्याचा कार्यक्रम चालू…

लेख वाचा
नवरंग १९ ऑक्टोबर २०२१२ मिनिटांचे वाचन

रंग हिरवा

‘हिरवे हिरवेगार गालिचे। हरिततृणाच्या मखमालीवरचे।’ बालकवींच्या ह्या अजरामर कवितेत हिरव्या रंगाच्या पार्श्वभूमीवर रविकर व फुलराणीच्या अनोख्या विवाहसोहळ्याचे अत्यं…

लेख वाचा