चव

देवाकडे भरपूर काहीतरी मागून देखील, भरपूर जाऊद्या पुरेल एवढेही काही मिळेनासे झाल्यावर आम्ही अंतर्मुख झालो. असे का व्हावे, याचा विचार करताकरता तो वाक्प्रचार कानावर आला – ‘चवीनं खाणार त्याला देव देणार!’ अच्छा! म्हणजे आपण चवीने खात नव्हतो तर!  चवीने खाण्याला एवढं महत्त्व आहे हे आम्हाला कळले. मग आम्ही प्रत्येक पदार्थात प्रोटीन, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स, न्यूट्रिशन व्हॅल्यू, व्हिटॅमिन्स, कन्टेन्ट (या शब्दांना मराठी वर्ड्स युज केले तर अंडरस्टँडिंगला डिफिकल्ट जाईल म्हणून इंग्रजी शब्द वापरले आहेत!) हे सारे न बघता फक्त चव बघू लागलो. टेस्ट (Taste) हीच त्या पदार्थांची टेस्ट(Test) समजून सेवन करू लागलो. आश्चर्य म्हणजे चवीनं खायला सुरुवात केल्यापासून देव देतोय की नाही ह्याचाच मुळात विसर पडला आणि आम्हाला चवीचं महत्व चांगलंच कळलं!

माणसाच्या जिभेचा समावेश हृदय - मेंदू - किडनी च्या बरोबरी जीवनावश्यक अवयवांमध्ये व्हायला हवा! बेचव खाल्ल्याने हृदयाला यातना होऊन मेंदूला कंटाळा येऊन किडनी खराब होऊ शकते हे आपण जाणतोच; त्यामुळे या मागणीचा गांभीर्याने विचार करावा! खरंच, चव नाहीशी झाल्यावर आयुष्य कसं बेचव होईल ना! चव आहे म्हणून चव आहे! एकदा चवदार पदार्थ पोटात गेल्यावर माणसाला कसा चेव येतो ते आपण पाहतोच. हीच चव माणसाला काय काय करायला लावते! काही सेकंद जिभेवर रेंगाळणाऱ्या पदार्थाला चव यावी म्हणून सगळा पाक-प्रपंच! त्या काही सेकंदासाठी माणसाने वेगवेगळे मसाले बनवले, गुळ-साखर बनवून त्यांच्या असंख्य मिठाया बनवल्या, समुद्रातून मीठ काढलं, शेतातून मिरची मोहरी आणली, कसलेकसले नाही ते उपद्व्याप केले – केवळ चव येण्यासाठी! ह्यात एकवेळ निसर्गाची चव बिघडली तरी चालेल आम्हाला चव दार मिळाले पाहिजे हा सिद्धांत उराशी बाळगला! पण कधीकधी अति चविष्ट किंवा काहीतरी चविष्ट अति खाल्ल्याने माणूस आजारी पडतो, जीभेची चव जाते आणि त्याच्या तोंडचं पाणी पळतं! मग कडू चवीच्या गोळ्या खाऊन प्रायश्चित्त करून घेतल्यानंतर ती रुसलेली रसना हसू लागते, चव परत येते!

कधी बेचव लागलं की तो लगेच पदार्थ बनवणे बनवणाऱ्याला चावायला लागतो. चव येणे व चावणे यातले साधर्म्य  तेव्हा जाणवते. रद आणि रसना ह्या जवळपासच्या अवयवांना अनुक्रमे चावणे व चव ओळखणे हे तेवढेच जवळपासचे कार्य-शब्द योजणाऱ्याचे कौतुक करावे वाटते. त्यांना खरी शब्दांची चव आहे हे जाणवते!

एक अनुभव मात्र एक अनुभव मात्र वैश्विक आहे. आजीच्या हातची चव आईच्या हाताला नसते आणि आईच्या हातची चव बायकोच्या हाताला नसते, असे - त्या तिघीही कोणाच्यातरी बायको, आई व आजी असल्या तरी - म्हणण्याची पद्धत आहे. त्यामुळे या तिघींच्या हाताची चव जवळपास सारखीच असली तरीपण खाणाऱ्याचं तिच्याशी काय नातं आहे यावर ती चव चांगली कि अति-चांगली ठरते. म्हणून चवदार पदार्थ कोणी केलाय यावर लक्ष केंद्रित न करता सदैव रुचकर, स्वादिष्ट आणि चविष्ट खात राहणे हेच श्रेयस्कर! काही मिळो न मिळो असे पदार्थ तुम्हाला मिळत राहणारच, कारण आम्ही सुरुवातीलाच म्हटलंय,

‘चवीनं खाणार त्याला देव देणार!

— सुनील भातंब्रेकर

© सुनील भातंब्रेकर, पुणे

हेही वाचा

आणखी लेख

सर्व लेख
ललित विनोद २० जुलै २०२६२ मिनिटांचे वाचन

धडक पक्ष्यांची

‘झुंजूमुंजू झालं. पूर्वेला तांबडं फुटलं. झाडाच्या एका फांद्यावर रात्रभर पायात फांदी घट्ट पकडून निजलेल्या पाखरांनी डोळे उघडले. चिमण्या उठल्या, कावळे उठले, कबुतरं…

लेख वाचा
नवरंग १९ ऑक्टोबर २०२१२ मिनिटांचे वाचन

रंग जांभळा

रंगाला जर स्पर्श करता आला असता तर सगळ्यात मुलायम रंग जांभळा लागला असता. जांभळा रंग बनवायला निसर्गाला प्रचंड कष्ट पडले असणार. लाल, काळा, निळा, थोडा गुलाबी, हलकास…

लेख वाचा
भाषा-संस्कृती २५ ऑक्टोबर २०२०३ मिनिटांचे वाचन

काना मात्रा वेलांटी उकार

जगात जशा शेकडो बोलीभाषा आहेत तशाच शेकडो लिप्या पण आहेत. त्यात आपल्या देवनागरी पासून ते लॅटिन रोमन व्हाया मंडेरिन, कांजी, काताकाना, हिरागाना, अरेबिक अशा असंख्य ल…

लेख वाचा