रंग केशरी

दैनिक संचारमध्ये प्रसिद्ध झालेला ‘रंग केशरी’
दैनिक संचारमध्ये प्रसिद्ध झालेले मूळ पान (मोठे पाहण्यासाठी टॅप करा)

केशरी ह्या रंगाची एक गंमत आहे. बाकी रंगांचे रंगांच्या वापरानुसार नाव बदलले. लाल रंग कपाळावर लावला की, गंध किंवा टिळा होतो. भुकटीला वापरला की, त्याचा गुलाल होतो. गणपतीला वाहाणाऱ्या कमळासाठी रक्तवर्णी होतो. पण हा केशरी रंग असा आहे की, त्याच्या वापराप्रमाणे हा रंग स्वतःचे नाव बदलतो. रंग तोच, पण नाव वेगळे. फळांना लागला की, नारंगी होतो. श्रीखंडात पडला की, केशरी रहातो आणि झेंड्याला किंवा वस्त्रांना लागला की, थेट भगवा होतो. नुसतंच नाव नाही तर त्याचा स्वभावही बदलतो.

हा रंग एखाद्या हरहुन्नरी, सत्शील, विवेकी व प्रेरित माणसासारखा वाटतो. दिवसभर कॉलेजमध्ये एखादी कविता रंगवून शिकवणारा प्राध्यापक संध्याकाळी देशभक्तिवर उत्कृष्ट प्रबोधन करतो आणि सुटीच्या दिवशी शेतात राबणारा शेतकरी असतो, - असं काहीसं ह्या रंगाचं असतं. सगळीकडे त्याची खास छाप मात्र उमटवतो. केशरी ऊर्फ भगव्या रंगात लाल, पांढऱ्या, पिवळ्या रंगाचे मिश्रण असल्यामुळे की काय, ह्या तिन्ही रंगांचे गुण म्हणजे त्याग, शुचिता व तेज हा रंग दाखवतो. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या झेंड्याचा रंग भगवा ठेवला असावा. आजपावेतो ह्या भगव्यासाठी कित्येक शूर शिलेदारांनी बलिदान दिलंय. स्फूर्ती देणारा हा रंग! ह्या रंगाचा तुम्ही झेंडा करा, फेटा करा, उपरणे करा, नाहीतर कमरेला शेला करा, थेट पोवाडाच गावा वाटतो. निसर्गानेही ह्याचे खास वैशिष्ट्य ओळखून ह्या रंगाची नैसर्गिक निर्मिती करणारी वनस्पती केशर ही अत्यंत दुर्मिळ व महाग ठेवलीय. हा जाता येता वापरायचा रंगच नाही. ‘आणि भगवा फडकला...’ हे कधीतरीच साजरे व्हायला हवे, भगव्याची शान तर टिकली पाहिजे?

ह्या रंगाला जशी स्फूर्ती द्यायची ताकद आहे तेवढीच भक्तीमध्ये झोकून देण्याची समर्पण वृत्ती देखील आहे. लाखो वारकऱ्यांचा हा देवता-स्वरूप झेंडा आहे. मात्र फक्त झेंडा, अंगावरचे वस्त्र शुभ्रच. संपूर्ण भगवे वस्त्र घालण्यासाठी समर्थांची शिकवण अंगीकारण्याची पात्रता लागते, ते साधेसुधे काम नाही, प्रचंड साधनेनंतर ती प्राप्त होते. त्यामुळे सहज नजर टाकावी आणि भगवा दिसावा असे घडत नाही. नाही म्हणायला नारंगी नावाच्या फळाला ह्या रंगाची प्राप्ती झाली आहे. पण ह्या फळावर रंगाचा एवढा प्रभाव पडला की, त्या फळालाच मुळी रंगाच्या नावाने ओळखले जाते. अजून काय मान असावा रंगाचा?

भगव्या रंगाची खरी ताकद ओळखायची असेल तर कुठल्याही शिवकालीन गडावर पायऱ्यांपासून वरपर्यंत कुठेही न थांबता चढावे, घामाने थबथबलेले शरीर गडावर झणाणणाऱ्या वाऱ्याने वाळू द्यावे, गडावरच्या महाराजांच्या पुतळ्याला मुजरा घालावा आणि नजर वरच्या भगव्याकडे न्यावी, तुमचा ऊर भरून येईल आणि बेंबीच्या देठापासून तुम्ही गर्जना कराल, ‘हर हर महादेव, जय भवानी - जय शिवाजी...!!!’

— सुनील भातंब्रेकर

© सुनील भातंब्रेकर, पुणे

हेही वाचा

आणखी लेख

सर्व लेख
ललित विनोद १४ नोव्हेंबर २०२०२ मिनिटांचे वाचन

पायरी

बऱ्याच वर्षापूर्वी मी जेव्हा पहिल्यांदा जपानमधील डिस्नेलँडला गेलो होतो. तेव्हा तिथल्या इतर कित्येक आकर्षणाएवढेच तिथल्या पायऱ्यांचं नवल वाटलं होतं. तिथल्या बहुते…

लेख वाचा
ललित विनोद २० जुलै २०२६२ मिनिटांचे वाचन

धडक पक्ष्यांची

‘झुंजूमुंजू झालं. पूर्वेला तांबडं फुटलं. झाडाच्या एका फांद्यावर रात्रभर पायात फांदी घट्ट पकडून निजलेल्या पाखरांनी डोळे उघडले. चिमण्या उठल्या, कावळे उठले, कबुतरं…

लेख वाचा
भाषा-संस्कृती २५ ऑक्टोबर २०२०३ मिनिटांचे वाचन

काना मात्रा वेलांटी उकार

जगात जशा शेकडो बोलीभाषा आहेत तशाच शेकडो लिप्या पण आहेत. त्यात आपल्या देवनागरी पासून ते लॅटिन रोमन व्हाया मंडेरिन, कांजी, काताकाना, हिरागाना, अरेबिक अशा असंख्य ल…

लेख वाचा